नवी दिल्ली : कर्णधार श्रेयस अय्यरने तीन चौकार आणि दहा षटकारांच्या साथीने नाबाद 93 धावांची खेळी उभारुन, दिल्ली डेअरडेव्हिल्समध्ये नवी जान ओतली. श्रेयसच्या याच खेळीच्या जोरावर दिल्लीने कोलकाता नाईट रायडर्सचा तब्बल 55 धावांनी धुव्वा उडवला.


याच सामन्यात युवा फलंदाज पृथ्वी शॉनेही महत्त्वाची भूमिका निभावली, ज्याचं मोठं कौतुक केलं जात आहे. सलामीला आलेल्या पृथ्वी शॉने 44 चेंडूत 62 धावांची खेळी केली, ज्यामध्ये दोन षटकार आणि सात चौकारांचा समावेश होता.

या अर्धशतकी खेळीमध्ये पृथ्वी शॉने असा एक शॉट खेळला, ज्यासाठी भारताचा एकमेव खेळाडू प्रसिद्ध आहे. टीम इंडियाचा विकेटकीपर महेंद्रसिंह धोनीचा हेलिकॉप्टर शॉट पृथ्वी शॉने खेळून सर्वांचं मन जिंकलं.

ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉनसनच्या गोलंदाजीवर पृथ्वी शॉने हेलिकॉप्टर शॉट लगावला.

पृथ्वी शॉचा हा शॉट पाहून प्रत्येक जण आवाक झाला. 18 वर्षाच्या या फलंदाजाने मिचेल जॉनसनसारख्या खेळाडूच्या वेगवान गोलंदाजीवर हा शॉट लगावल्याने त्याचं जोरदार कौतुक झालं.

सामन्यानंतर पृथ्वीला या शॉटबद्दल प्रश्न विचारण्यात आला. मात्र हा शॉट खेळण्यासाठी आपण खास तयारी केली नव्हती, तो आपोआप खेळला गेला, असं पृथ्वी शॉ म्हणाला.

या सामन्यात दिल्लीने पहिल्यांदा फलंदाजी करताना चार बाद 219 धावांची मजल मारली होती. त्यानंतर कोलकात्याला नऊ बाद 164 धावांचीच मजल मारता आली.

व्हिडीओ :