मुंबई: भारत आणि वेस्ट इंडिज संघांमधल्या कसोटी मालिकेचा हिरो ठरला तो मुंबईचा पृथ्वी शॉ. त्यानं कसोटी पदार्पणातच जबरदस्त कामगिरी बजावून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला आपल्या आगमनाची वर्दी दिली. पृथ्वीच्या या कामगिरीमुळं भारतीय क्रिकेटरसिकांना त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

मुंबईच्या पृथ्वी शॉनं वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत मालिकावीराचा किताब पटकावला आणि आपलं नाणं खणखणीतपणे वाजवून दाखवलं. पृथ्वीनं दोन कसोटी सामन्यांमधल्या तीन डावांत तब्बल 118.5 च्या सरासरीनं सर्वाधिक 237 धावांचा रतीब घातला. त्यात एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश होता.

पृथ्वी शॉच्या या कामगिरीवर टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री इतके खूश झाले आहेत, की त्यांना पृथ्वीच्या फलंदाजीत सचिन, लारा आणि सहवाग ही त्रिमूर्ती डोकावताना दिसत आहे. टीम इंडियाचे गुरुजी म्हणतात त्यानुसार खरंच पृथ्वीमध्ये या तिन्ही दिग्गजांचे गुण आहेत का? हे पाहिल्यास तसंच दिसतं. कारण

सचिनसारखं स्थिर डोकं आणि घोटवून घेतलेलं पक्कं तंत्र....



सहवागच्या वृत्तीतली आणि फलंदाजीतली आक्रमकता......



लाराचा हाय बॅकलिफ्ट आणि धावांचा वाहता ओघ......



पृथ्वीच्या याच तीन वैशिष्ट्यांमुळं त्याच्या फलंदाजीत सचिन, सहवाग आणि लाराही डोकावतो असं शास्त्री यांचं मत आहे. पण भारताचा सलामीवीर गौतम गंभीरनं पृथ्वी शॉच्या इतर दिग्गजांशी होत असलेल्या तुलनेवर परखड मत व्यक्त केलं आहे. गंभीर म्हणतो की, पृथ्वीची सहवाग किंवा इतरांशी आताच तुलना करण्याआधी दोनदा विचार करा. त्याच्या कारकीर्दीची ही सुरुवात आहे. त्याला बहरण्यासाठी अजूनही वेळ द्या.

गौतम गंभीरचं म्हणणं सोळा आणे खरं असलं तरी पृथ्वी शॉच्या यशस्वी पदार्पणानं भारतीय क्रिकेटमध्ये एक वेगळंच चैतन्य पसरलं आहे, हेही तितकंच खरं आहे. त्याचं श्रेय अर्थातच पृथ्वीच्या नैसर्गिक फलंदाजीला द्यावं लागतं. अंडर नाईन्टिन, रणजी, दुलीप आणि भारत अ संघांमधून खेळताना दाखवलेली सहजता कसोटी पदार्पणातही त्याच्या फलंदाजीत दिसली. त्यामुळंच देशभरातल्या क्रिकेटरसिकांना सध्या पृथ्वी शॉचं वेड लागलं आहे.

पृथ्वी शॉच्या वाढलेल्या लोकप्रियतेचा दुसरा अर्थ म्हणजे त्याच्याकडून असलेल्या अपेक्षाही आणखी उंचावल्या आहेत. भारताची वेस्ट इंडिजविरुद्धची मायदेशातली मालिका तर आटोपली, आता पृथ्वी श़ॉसमोरचं पुढचं आव्हान आहे ते ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं. ऑस्ट्रेलियातल्या बाऊन्सी खेळपट्ट्या आणि कांगारुंच्या वेगवान आक्रमणासमोर पृथ्वी शॉचा कसा कस लागतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.