माऊंट मॉन्गानुई/ न्यूझीलंड : अंडर-19 विश्वचषकावर भारताने चौथ्यांदा नाव कोरलं. ऑस्ट्रेलियाच्या 217 धावांचं आव्हान टीम इंडियाने अवघ्या 38.5 षटकातच पूर्ण केलं. मनजोत कालरच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने अंतिम सामन्यात कांगारुंवर तब्बल 8 गडी राखून मात केली.


मनजोतन 101 चेंडूत नाबाद 102 धावा केल्या. भारताने याआधी 2000, 2008 आणि 2012 साली अंडर-19 विश्वचषक जिंकला होता. कर्णधार पृथ्वी शॉ आणि मनजोतने भारतीय संघाला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र पृथ्वी शॉ 29 धावांवर बाद झाला. अंतिम सामन्यात मोठी धावसंख्या उभारता आली नसली तरी पृथ्वी शॉने एक मोठा विक्रम नावावर केला.

अंडर-19 विश्वचषक जिंकणारा पृथ्वी शॉ सर्वात कमी वयाचा कर्णधार बनला आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मिचेल मार्शच्या नावावर होता.

पृथ्वीने हा विक्रम 18 वर्षे, 2 महिने आणि 27 दिवस या वयात केला. मार्शने 2010 साली विश्वचषक जिंकला होता. तेव्हा त्याचं वय 18 वर्षे, 3 महिने आणि 12 दिवस एवढं होतं. यानुसार पृथ्वी आता जगातील सर्वात कमी वयाचा कर्णधार बनला आहे, ज्याच्या नेतृत्त्वात अंडर-19 विश्वचषक जिंकता आला.

यापूर्वी भारताने विराट कोहली, मोहम्मद कैफ आणि उन्मुक्त चंद यांच्या नेतृत्त्वात विश्वचषक जिंकला होता. मात्र पृथ्वी शॉ त्यांच्यापेक्षा वयाने लहान आहे.