लखनौ : मुंबईचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉने दुलीप करंडकात मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. 25 सप्टेंबर रोजी सुरु झालेल्या दुलीप करंडकाच्या अंतिम सामन्यात खेळताना पहिल्याच दिवशी त्याने शतक ठोकलं. दुलीप करंडकाच्या अंतिम सामन्यात शतक ठोकणारा तो सर्वात तरुण क्रिकेटर ठरला आहे.


मुंबईकर पृथ्वी शॉ केवळ 17 वर्षांचा आहे. इंडिया रेडकडून खेळताना त्याने अंतिम सामन्याच्या पहिल्याच दिवशी शतक पूर्ण केलं. लखनौत खेळवल्या जात असलेल्या दुलीप करंडकात इंडिया रेड आणि इंडिया ब्ल्यू यांच्यात डे-नाईट अंतिम सामना सुरु आहे.

नाणेफेक जिंकून अगोदर फलंदाजी करताना इंडिया रेडने 89 धावांवर 2 विकेट्स गमावल्या. मात्र यानंतर कर्णधार दिनेश कार्तिक आणि पृथ्वी शॉ यांनी शतकी भागीदारी पूर्ण केली.

पृथ्वी शॉने 2016-17 च्या रणजी मोसमातल्या उपांत्य सामन्यात तामिळनाडूविरूद्ध रणजी स्पर्धेत पदार्पण केलं होतं. या पदार्पणाच्या सामन्यातच त्याने शानदार शतक झळकावलं होतं. त्यानंतर आता दुलीप करंडकामध्येही त्याने पदार्पणातच शतक पूर्ण केलं. विशेष बाब म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही रणजी, दुलीप आणि इराणी करंडक या देशातल्या महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये पदार्पणातच शतक झळकावण्याचा पराक्रम गाजवला आहे. त्यामुळे रणजी आणि आता दुलीप करंडकात शतक ठोकून पृथ्वी सचिनच्या या विक्रमाच्या जवळ पोहोचला आहे.

पृथ्वी शॉने यापूर्वी भारताच्या अंडर-19 संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. इंग्लंड-अ विरूद्धच्या कसोटी मालिकेत खेळताना त्याने दोन सामन्यांमध्ये सर्वाधिक 250 धावा कुटल्या होत्या. 2013 साली मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या 16 वर्षांखालील हॅरिस शील्ड या शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट फ्रान्सिस संघाविरुद्ध खेळताना पृथ्वी शॉने 330 चेंडूंमध्ये 546 धावा फटकावण्याचा पराक्रम केला होता. या खेळीनंतरच तो चर्चेत आला. या खेळीदरम्यान त्याने तब्बल 85 चौकार आणि 5 षटकार ठोकले होते.