मुंबई : विराट कोहलीची टीम इंडिया आणि रंगाना हेराथचा श्रीलंका संघ पहिल्या कसोटीसाठी सज्ज झाले आहेत. श्रीलंका दौऱ्यातल्या पहिल्या कसोटी सामन्याला उद्यापासून गॉलच्या मैदानात सुरुवात होत आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीसाठी ही केवळ नव्या मोहिमेची सुरुवात नाही, तर मागच्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे. कारण 2015 सालच्या श्रीलंका दौऱ्यात विराट कोहलीच्या टीम इंडियाला गॉल कसोटीत लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.


आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीच्या निकषावर गॉलची ही कसोटी म्हणजे खरं तर दोन असमान ताकदीच्या संघांमधली लढाई आहे. कारण आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत टीम इंडिया सध्या नंबर वन आहे, तर श्रीलंका चक्क सातव्या स्थानावर आहे. पण मायदेशात खेळताना सातव्या स्थानावरच्या श्रीलंकेचं आव्हान कमी लेखता येणार नाही. त्यात नुकत्याच झालेल्या कोलंबो कसोटीत झिम्बाब्वेवर चार विकेट्सनी मिळवलेल्या विजयानं श्रीलंकेचा आत्मविश्वासही दुणावलेला आहे.

विराट कोहलीच्या टीम इंडियाच्या दृष्टीनं गॉलची ही लढाई म्हणजे नव्या मोहिमेची निव्वळ नांदी नाही, तर मागच्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे. 2015 सालच्या श्रीलंका दौऱ्यात विराटच्या भारतीय संघाला गॉलच्या याच मैदानात लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. सदर कसोटीत विजयासाठी अवघ्या 176 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग भारतीय संघाला पेलवला नव्हता. रंगाना हेराथनं 48 धावांत सात विकेट्स काढून टीम इंडियाचा अवघ्या 112 धावांत खुर्दा उडवला होता. भारतीय संघानं पुढच्या दोन्ही कसोटी जिंकून, मालिकेत 2-1 असा विजय मिळवला असला तरीही गॉलच्या पराभवाची जखम अजूनही भरलेली नाही.

गेल्या दोन वर्षांत कसोटी क्रिकेटच्या दुनियेत टीम इंडियाचं वजन खूपच वाढलं आहे. 2015 सालच्या गॉल कसोटीपासून आजच्या गॉल कसोटीआधी भारतानं सतरापैकी बारा कसोटी सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. कर्णधार या नात्यानं विराट कोहली अधिक परिपक्व झाला आहे. त्यामुळं विराट आणि त्याचे शिलेदार गॉलच्या कसोटीत नव्या आत्मविश्वासानं मैदानात उतरतील.

गॉलच्या या कसोटीत टीम इंडियाच्या दृष्टीनं चिंतेची एकमेव बाब म्हणजे मुरली विजय आणि लोकेश राहुल हे सलामीचे मूळ पर्याय मैदानात उतरू शकणार नाहीत. मुरली विजय अजूनही दुखापतीतून सावरलेला नसल्यानं, त्याच्याऐवजी शिखर धवनचा संघात समावेश करण्यात आला आहे, तर श्रीलंका दौऱ्यात लोकेश राहुल तापानं फणफणल्यानं अभिनव मुकुंदला कसोटीत पुनरागमन करण्याची संधी मिळणार आहे.

श्रीलंकेचा कर्णधार आणि डावखुरा स्पिनर रंगाना हेराथ हा गॉल कसोटीत भारतीय फलंदाजांची मोठी परीक्षा ठरावा. त्यानंच श्रीलंकेला 2015 सालची गॉल कसोटी जिंकून दिली होती. नुकत्याच झालेल्या कोलंबो कसोटीत त्यानंच अकरा विकेट्स काढून श्रीलंकेला झिम्बाब्वेवर विजय मिळवून दिला. त्यामुळं हेराथला टप्पा आणि लय मिळू देणं टीम इंडियाच्या दृष्टीनं धोक्याचं ठरू शकतं.

रंगाना हेराथच्या आव्हानाला कसं सामोरं जायचं याची रणनीती आखण्यासाठी टीम इंडियाला नवा हेडमास्तर रवी शास्त्रीचं मार्गदर्शन मोलाचं ठरावं. अनिल कुंबळेला चेकमेट करून पुन्हा हेडमास्तर बनलेल्या शास्त्रीसाठीही 2015 सालच्या गॉलच्या पराभवाची जखम भरणं गरजेचं आहे.