मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीने दिलेले फिटनेस चॅलेंज पूर्ण केलं. नरेंद्र मोदी यांनी योग करतानाचा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. यानंतर त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आणि टेबल टेनिसपटू मनिका बत्रा आणि 40 वर्षांवरील आयपीएस अधिकाऱ्यांना नॉमिनेट केलं आहे.


मनिका बत्रा आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत टेबल टेनिसच्या महिला एकेरी गटात सुवर्ण पदक जिंकून मनिका बत्राने इतिहास रचला होता.

अंतिम सामन्यात मनिका बत्राने सिंगापूरच्या यू मेंग्यूचा 4-0 असा पराभव करुन राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक दुसरं पदक मिळवलं होतं. यानंतर भारताला खऱ्या अर्थाने मनिकाची ओळख झाली.

कोहलीचं चॅलेंज मोदींकडून पूर्ण, आता मोदींचं चॅलेंज....

फिटनेस माझं पुढचं लक्ष्य : मनिका
मनिका बत्राने एका मुलाखतीत म्हटलं होतं की, "मला माझ्या फिटनेसवर लक्ष द्यायचं आहे. कारण टेबल टेनिस हा वेगवान खेळ आहे आणि चांगल्या खेळाडूंना पराभूत करण्यासाठी फिटनेसही चांगला हवा. मला वाटतंय की आता आणखी फिट होण्याची आणि खेळात वेग आणण्याची गरज आहे.


देशाचं नाव उज्ज्वल करायचंय : मनिका
22 वर्षीय मनिकाने 21व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तीन वेळा ऑलिम्पिकपदक विजेती सिंगापूरच्या फेंग तिआनवेई आणि  सिंगापूरची दुसऱ्या क्रमांकाची टेबल टेनिसपटू यू मेंग्यूचा पराभव केला. बॅडमिंटनमध्ये जसं सायना नेहवाल आणि पीव्ही सिंधूने भारताचं नाव उंचावलं, तसंच टेबल टेनिसमध्ये मला देशाचं नाव उज्ज्वल करायचं आहे.

विराटचं चॅलेंज मोदींनी स्वीकारलं, तर अनुष्काने पूर्ण केलं!