नवी दिल्ली: पुढील महिन्यांपासून ब्राझीलमध्ये सुरु होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धांच्या पूर्वी देशभरातील जनतेच्या मनात या खेळांसाठी उत्साह निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने 'रन फॉर रिओ'चे आयोजन केले आहे. या स्पर्धेला पंतप्रधान नरेंद्र मोदी ३१ जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी एसोमॅच संमेलनादरम्यान ही माहिती दिली. ते म्हणाले की, ''संपूर्ण देशभरात रिओ ऑलम्पिकचा उत्साह निर्माण करण्यासाठी इंडिया गेटवर 'रन फॉर रिओ'चे आयोजन केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी या विषयावर चर्चा केली असता, त्यांनी स्वत: उपस्थित राहून स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवणार असल्याचे सांगितले.'' तसेच १ ऑगस्ट रोजी दिल्लीतील सेंट्रल पार्कवर भव्य स्क्रिन लाऊन ऑलम्पिक स्पर्धेच्या उद्धाटन सोहळ्याचे प्रक्षेपण करणार असल्याचेही गोयल यांनी यावेळी सांगितले.
एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी या सामन्यांसाठी महिला पैलवानांसोबत महिला फिजिओही जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच या स्पर्धेसाठी टेनिसपटू सानिया मिर्जाची आई नसीम ही इतर खेळाडूंसोबत स्पर्धकांचे मनोबल वाढवण्यासाठी रिओला जाणार असल्याचे क्रीडा सचिव राजीव यादव यांनी सांगितले.