Thomas Cup 2022 : तब्बल 73 वर्षानंतर  थॉमस कपच्या (Thomas Cup) अंतिम सामन्यात पोहोचलेल्या भारताने इंडोनेशियाला मात देत चषकावर नाव कोरलं आहे. सर्वात आधी पुरुष एकेरीत लक्ष्य सेनने सामना जिंकला. नंतर दुसऱ्या पुरुष दुहेरी सामन्यात भारतीय बॅडमिंटनपटू जोडी सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीने विजय मिळवला. त्यानंतर नुकताच दुसऱ्या पुरुष एकेरी सामन्यात किंदम्बी श्रीकांतने (kidambi srikanth) जोनाथन क्रिस्टीला (Jonatan Christie) मात देत सामना तर जिंकलाच पण सोबतच भारताला 5 पैकी 3 सामने जिंकवून देत कपही जिंकवून दिला आहे.



तब्बल 74 वर्षांनंतर प्रथमच थॉमस कपमध्ये अंतिम सामना खेळणं ही भारतासाठी फार मोठी गोष्ट होती. सेमीफायनलमध्ये डेन्मार्क संघाला नमवत भारताच्या पुरुष बॅडमिंटन संघाने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. ज्यानंतर आता पहिले तीन सामने जिंकत कपही खिशात घातला आहे. या विजयानंतर सर्वच स्तरातून भारतीय बॅडमिंटन संघावर कौतुकाचा वर्षाव होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत.


 


लक्ष्य सेननं रचला पाया


या महत्त्वाच्या स्पर्धेत सर्वात आधी भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननं अंतिम फेरीत इंडोनेशियन खेळाडू अँथॉनी गिंटिंगचा (Anthony Ginting) पराभव करत दमदार कामगिरी केली आहे. त्याने पहिल्या सामन्यात इंडोनेशियन खेळाडू अँथनी सिनिसुका गिंटिंगचा 8-21, 21-17 आणि 21-16 असा पराभव केला. या सामन्यात लक्ष्यने आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर एक तास पाच मिनिटांत विजय मिळवला. या विजयासह भारताने 1-0 अशी आघाडी घेतली. 


पुरुष दुहेरीत भारत विजयी


थॉमस कप (Thomas Cup) स्पर्धेतील पहिला सामना पुरुष एकेरीत लक्ष्य सेनने (Lakshya Sen) जिंकल्यानंतर आता दुसऱ्या पुरुष दुहेरी सामन्यात भारतीय बॅडमिंटनपटू जोडी सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीने विजय मिळवला. या भारतीय जोडीने इंडोनेशियाच्या मुहम्मद एहसान आणि केविन संजया यांना 18-21, 23-21, 21-19, अशा फरकाने मात दिली आहे. दरम्यान या स्पर्धेतील पाच सामन्यांपैकी जो संघ आधी तीन सामने जिंकले त्याला चॅम्पियन घोषित केलं जाणार आहे. दरम्यान भारताने आतापर्यंत दोन सलग सामने जिंकत आघाडी घेतली आहे.  


तिसरा सामना किंदम्बीने जिंकला


तिसऱ्या सामन्यात किंदम्बी श्रीकांतने (kidambi srikanth) इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीला मात देत तिसरा सामना जिंकत भारताचा विजय पक्क केला. या सामन्यात श्रीकांतने सुरुवातीच्या दोन सेट्समध्ये विजय मिळवत सामना नावे केला. त्याने 21-15, 22-21 च्या फरकाने क्रिस्टीला मात देत सामना आणि कप भारताच्या नावे केला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या