सेंच्युरियन : भारतीय संघ सध्या द. आफ्रिकेच्या दौऱ्यावर असून पहिल्या कसोटीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा पराभव टीम इंडियाच्या बराच जिव्हारी लागला आहे. याच पराभवाचा संघातील खेळाडूंवर देखील काही प्रमाणात परिणाम झाला आहे. त्यातून बाहेर येण्यासाठी भारताच्या फिजिओनं एक नवा खेळ सुरु केला.
मागील पराभव विसरण्यासाठी टीम इंडियाच्या खेळाडूंकडून फिजिओ पॅट्रिक फराडनं खास तयारी करुन घेतली आहे.
टीम इंडियासाठी 'नवा' खेळ
खेळाडूंवरील ताण कमी होण्यासाठी फिजिओकडून दरवेळेस नवनवे प्रयोग केले जातात. असाच एक नवा प्रयोग पॅट्रिकनं आता केला आहे. या गेमसाठी टीम इंडियाच्या खेळाडूंना पिवळे आणि लाल असे दोन रुमाल वाटण्यात आले. या गेममध्ये प्रत्येकाला आपल्या रुमालाचं रक्षण करुन दुसऱ्याचा रुमाल खेचायचा होता.
या खेळाचा हेतू एवढाच होता की, खेळाडूंचा ताण कमी करणं आणि सरावात थोडीशी मजाही.
दरम्यान, केपटाऊनमधील पराभवानंतर टीम इंडियाचे खेळाडू बरेच तणावाखाली होते. पण या नव्या खेळामुळे ते काहीसे रिलॅक्स झाले आहेत. तसं पाहायला गेलं तर हे गरजेचंही होतं. कारण की, सेंच्युरियनच्या कसोटीत भारताला विजय आवश्यक आहे.