धरमशाला : विराट कोहलीच्या अनुपस्थितीत टीम इंडियाने धरमशाला वन डेत श्रीलंकेसमोर सपशेल लोटांगण घातलं. श्रीलंकेने टीम इंडियाचा सात विकेट्सनी धुव्वा उडवून तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात श्रीलंकेसमोर विजयासाठी अवघं 113 धावांचं लक्ष्य होतं. ही कामगिरी आमच्यासाठी डोळे उघडणारी होती, असं कर्णधार रोहित शर्माने म्हटलं आहे.


भारतीय फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. आणखी 70 ते 80 धावा काढता आल्या असत्या तर परिस्थिती वेगळी असती. अशा परिस्थितीत चांगलं प्रदर्शन करणं गरजेचं आहे. ही कामगिरी डोळे उघडणारी होती, असं रोहित शर्मा म्हणाला.

श्रीलंकेने अवघ्या तीन विकेट्सच्या मोबदल्यात 113 धावांचं आव्हान पार केलं. त्यात सलामीच्या उपुल थरंगाचा 49 धावांचा वाटा मोलाचा ठरला. अँजलो मॅथ्यूज 25, तर निरोशन डिकवेला 26 धावांवर नाबाद राहिला.

या परिस्थितीत महेंद्रसिंग धोनीने एक खिंड लढवून भारतीय संघावर नीचांकाची लाजिरवाणी वेळ येऊ दिली नाही. त्याने 10 चौकार आणि दोन षटकारांसह 65 धावांची खेळी उभारली. मात्र धोनीची खेळी ही आमच्यासाठी सरप्राईज नव्हती. कोणत्या परिस्थितीत कसं खेळायचं हे त्याला चांगलं माहित आहे, असंही रोहित शर्माने सांगितलं.