मुंबई : भारताचा वन डे आणि टी-20 क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा जाहिरात क्षेत्रातील प्रभाव कमी होत असल्याचं दिसत आहे. कोल्ड ड्रिंक आणि स्नॅक्सची निर्मिती करणारी प्रसिद्ध कंपनी पेप्सिकोने धोनीसोबतचा 11 वर्ष जुना करार रद्द केला आहे.
खरंतर धोनी हा देशातील सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू आहे. जाहिरातदार क्षेत्रात धोनीची लोकप्रियात घटल्याचे संकेत पेप्सिकोच्या या निर्णयामुळे मिळत आहेत.
महेंद्रसिंह धोनी कोल्ड ड्रिंक पेप्सी आणि लेज चिप्सच्या जाहिरातींमध्ये दिसत होता. 2005 मध्ये पेप्सिको आणि धोनीमध्ये करार झाला होता. ओह येस अभी आणि चेंज द गेम या कंपनीच्या मोठ्या कॅम्पेनमध्येही धोनीचा समावेश होता.
पेप्सिकोने नेहमीच खेळ आणि बॉलिवूड जगतातील टॉप सेलिब्रिटींना ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनवलं आहे. सध्या विराट कोहली, रणबीर कपूर आणि परिणीती चोप्रासारखे सेलिब्रिटी पेप्सिको ब्रॅण्ड्सच्या उत्पादनांची जाहिरात करत आहेत.
फोर्ब्ज मॅगझीन 2016च्या यादीनुसार, जाहिरातीसाठी 2.7 कोटी डॉलरची कमाई करणाऱ्या धोनीचा समावेश जगात सर्वाधिक मानधन घेणाऱ्या खेळाडूमध्ये होते. फोर्ब्जच्या अंदानुसार, धोनीचा पगार आणि प्रोपेशनल अर्निंग 40 लाख डॉलर आणि जाहिरातींमधून तो 2.70 कोटी डॉलर आहे.
2014 पर्यंत धोनी पेप्सिको, रिबॉक, बूस्ट, डाबर, सोनी, टीव्हीएस मोटर्स, व्हिडीओकॉन ओरिएंट फॅन, बिग बाजारसह 18 ब्रॅण्डची जाहिरात करत होता. प्रत्येक जाहिरातीसाठी तो 10-12 कोटी रुपये घेत होता. पण आता मात्र तो 10 ब्रॅण्डचीच जाहिरात करत आहे.