कराची: पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड (पीसीबी)चे अध्यक्ष शहरयार खान यांनी एक वेगळीच मागणी केली आहे. आयसीसी आयोजित मालिकांमध्ये भारत विरुद्ध पाक सामन्यातील नफ्यामध्ये पाकिस्तानला सर्वाधिक हिस्सा मिळायला हवा. अशी अजब मागणी शहरयार खान यांनी केली आहे.


 

शहरयार खान यांचं म्हणणं आहे की, दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय सामने पाकिस्तानात आयोजित केले जात नाही. त्यामुळेच बोर्डाकडे पैशांचा ओघ कमी झाला आहे. त्यामुळे बोर्डाच्या पैशात वाढ व्हावी यासाठी अनेक वेगवेगळ्या साधनांचा वापर केला जात असून हा देखील पर्याय आम्हाला दिसतो आहे.

 

खान यांनी पीसीबीला आदेश देण्यासाठी काही कागदपत्रं तयार केली आहेत. यातील काही कागदपत्र ईएसपीएन या वेबसाइटला मिळाली आहेत. त्याच आधारे या वेबसाइटनं दावा केला आहे. खान यांचं म्हणणं आहे की. 'पाकिस्तान आयसीसी आयोजित मालिकांमध्ये भारताविरुद्ध खेळणं सुरु ठेवणार आहे. यामधून मिळणारं मनोरंजन आणि पैसा हे खूपच जास्त आहे. या दोघांच्या सामन्यातील तिकीट विक्री ही तुफान असते.'

 

'भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यातून आयसीसीलाही फारच जास्त कमाई होते. यामुळे सगळ्या सदस्यांनाही फायदा होतो. म्हणूनच आमची मागणी आहे की, यातून होणाऱ्या कमाईचा सर्वाधिक हिस्सा पाकिस्तानला मिळायला हवा.' खान यांनी नुकतंच एडिनबर्गमध्ये झालेल्या आयसीसीच्या वार्षिक बैठकीतही ही मागणी केली होती.

 

2009 साली पाकिस्तनाच्या दौऱ्यावर श्रीलंकेचा संघ गेला होता. त्यावेळी त्यांच्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय सामन्यांचं यजमानपद काढून घेण्यात आलं आहे. यामुळे पाकिस्तानला अनेकदा सामने यूएई मध्ये खेळावे लागतात.

 

सामने परदेशात खेळावावे लागल्यानं त्याचा भार बोर्डावर पडतो. तसेच देशातील खेळाच्या विकासावर फरक पडतो. असं शहरयार यांचं म्हणणं आहे.