Punjab vs Delhi: केएल राहुलच्या जागी कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या मयंक अग्रवालच्या शानदार नाबाद 99 धावांच्या बळावर पंजाबनं दिल्लीला 167 धावांचं आव्हान दिलं आहे. आयपीएल 2021 मधील 29 वा सामना आज पंजाब आणि दिल्ली यांच्यात खेळला जात आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात आज केएल राहुलच्या जागी मयांक अग्रवालकडे पंजाब संघाची धुरा आहे.
पंजाबनं प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर प्रभासिमरन सिंह 12 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेला ख्रिस गेल केवळ 13 धावा करु शकला. यानंतर डेविड मलान आणि मयांकनं डाव सावरला. मलान 26 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेला दीपक हुडा केवळ एका धावेवर बाद झाला.
त्यानंतर आलेला शाहरुख खान 4 तर ख्रिस जॉर्डन 2 धावांवर बाद झाले. मयांकनं शेवटपर्यंत एका बाजूने खिंड लढवली. त्याने नाबाद 99 धावा केला. त्याने 58 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकार ठोकले. दिल्लीकडून कगिसो रबाडानं तीन विकेट घेतल्या तर आवेश खान, अक्षर पटेलनं एक एक विकेट घेतली.
दिल्लीने आतापर्यंत सात मॅचपैकी पाच सामने जिंकले आहेत. पॉईंट टेबलमध्ये दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर पंजाबने आतापर्यंत सात सामन्यांपैकी तीनच सामन्यात विजय मिळवला आहे.