पंढरपूर :  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभामध्ये सत्ताधारी महाविकास आघाडीचा भ्रमनिरास झाला आहे,अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. तसेच अजित पवारांची टगेगरी संपली आहे,असा टोलाही आमदार पडळकर यांनी लगावला आहे. देवेंद्र फडवणीस यांनी या निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम करा, मी राज्यात करेक्ट कार्यक्रम करतो असे बोलले होते. त्यानुसार  पंढरपूर-मंगळवेढा म्हधील जनतेने हा कार्यक्रम केलाय. आता पुढचे फडणवीस ठरवतील, असेही पडळकर म्हणालेत. प्रचारावेळी फडवणीस यांचे हे वक्तव्य बरेच गाजले होते. त्यामुळे आता पंढरपूर मध्ये यश मिळाल्यानंतर फडवणीस काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे


 पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांचा भाजपाचे उमेदवार समाधान अवताडे यांनी पराभव केला आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी मंगळवेढा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या विजयानंतर भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांचे फोन वरून आभार मानले आहेत.तर या विजयावरून आमदार पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.पोट निवडणुकीमध्ये आपलाच विजय होणारा,असा भ्रम होता,मात्र त्यांची निराशा झाली आहे, असे पडळकर म्हणालेत.


समाधान आवताडे आणि भगीरथ भालके यांनी मिळालेली मते


 


समाधान आवताडे



  • ईव्हीएम- 1,07,774 मते

  • पोस्टल - 1676 मते

  • एकूण-  1,09,450 मते


भगीरथ भालके



  • ईव्हीएम- 1,04,271 मते

  • पोस्टल- 1446 मते

  • एकूण- 1,07,717 मते


भाजप आणि राष्ट्रवादी तसेच महाविकास आघाडीनेही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनवली होती. भाजपकडून देवेंद्र फडणवीसांपासून चंद्रकांत पाटील असे सर्वच मोठे नेते येथे प्रचाराला उतरले होते. त्याचाच फायदा इथे समाधान आवताडेंना झाला. राष्ट्रवादीकडूनही उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांच्यासह महाविकास आघाडीतले अनेक नेते येथे तळ ठोकून होते. मात्र राष्ट्रवादीच्या या प्रचाराचं यशात रुपांतर झालं नाही