पट्टाया (थायलंड) : आठव्या जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारतीय शरीरसौष्ठवपटूंनी फाइव्हस्टार कामगिरी करीत एका सुवर्णासह पाच पदके पटकावण्याची किमया साधली.
भारताला ज्यूनियर गटात 75 किलो वजनी गटात इफाम मोहम्मद वश्मीर खान या 19 वर्षीय युवकाने स्वप्नवत सुवर्ण जिंकून दिले. भारताने दमदार कामगिरी केली असली तरी पहिला दिवस गाजवला तो थायलंडच्या खेळाडूंनी. यजमानांनी चोहोबाजूंनी पदकांचा सपाटा लावत सहा सुवर्ण, सहा रौप्य आणि 3 कांस्य अशी 15 पदके जिंकून संस्मरणीय यश संपादन केले
किमान 15 पदकांचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून पट्टायाला उतरलेल्या भारताच्या जंबो संघाने पहिल्या दिवशी अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळवले. दिवसाच्या प्रारंभीच एम.राममूर्ती, एस. भास्करन, राहुल सिंधा या खेळाडूंनी 55, 60 आणि 65 किलो वजनी गटाची अंतिम फेरी गाठून जबरदस्त सुरूवात करून दिली. राममूर्तीने भारताला पहिले पदक जिंकून दिले. मात्र त्याचे पदक सोनेरी होऊ शकले नाही. जबरदस्त तयारीत असलेल्या भास्करनकडून पदकाची अपेक्षा होती, पण त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यानंतर राहुल सिंधाने कांस्य जिंकून भारताला दुसरे यश संपादून दिले.
भारतीय महिला जोरात
महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत रबिता देवी आणि ममता देवीला अंतिम फेरी गाठता आली नाही. 55 किलो वजनी गटात सरिता देवीने अंतिम फेरी गाठली खरी पण तगड्या प्रतिस्पर्ध्यांपुढे ती खुजी वाटली आणि तिला चौथ्या स्थानावरच समाधान मानावे लागले. मात्र फिजीक फिटनेस प्रकारात सोनिया मित्रा आणि श्रेयशी दास चौधरी यांनी पदके जिंकून भारताच्या पदकांची संख्या चार वर नेली. 40 ते 49 वर्षे वयाच्या गटात मंदार चवरकर अपयशी ठरला. मात्र पीटर जोसेफने अंतिम फेरी स्थान मिळवले. तोसुद्धा पदक मिळविण्यात कमी पडला.
थायलंडचे सांघिक विजेतेपद निश्चित
पहिल्याच दिवशी 15 पदके जिंकणाऱया थायलंडने आपले सांघिक विजेतेपदही जवळजवळ निश्चित केले आहे. थायलंडला पुरूषांच्या 65 किलो वजनी गटात, महिलांच्या फिटनेस फिजीकमध्ये दोन, वरिष्ठांच्या शरीरसौष्ठवाचे एक ,ज्यूनियर गटाचे एक आणि फिजीक फिटनेसचे एक असे सहा सुवर्ण जिंकून अनोखा षटकार ठोकला.
जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेच्या पहिल्या दिवसाचा निकाल :
55 किलो वजनी गट (पुरूष )- 1. कान खुआँग (विएतनाम), 2. एम. रामामूर्ती (भारत), 3. शाओ ली झू (चीन), 4. मुजाहिद हुसेन (पाकिस्तान), 5. चैपिपात लिवत्राकुल (थायलंड).
60 किलो - 1. नुयेन आन्ह थाँग (विएतनाम), 2. जिराफन पौंगकाम (थायलंड), 3. मालवर्न अब्दुल्ला (मलेशिया), 4. एस. भास्करन (भारत), 5. तुन तुन आँग (म्यानमार).
65 किलो - 1. सोमखित सुमेथोवेचाकुन (थायलंड), 2. सुरासक पानरूआंग (थायलंड), 3. राहुल सिंधा ( भारत ), 4. अब्दुल रानी (मलेशिया), 5. झांग झियो यान (चीन).
महिला फिटनेस फिजीक (160 से.मी.पर्यंत)-1. नाँगयाओ कोसीनाम (थायलंड), 2. सोनिया मित्रा (भारत), 3. सिरीपॉर्न सोर्नचॉय (थायलंड).
महिला फिटनेस फिजीक (165 से.मी.पर्यंत)-1. सोफिया क्रासाकोविक्स (हंगेरी), 2. अजारी तनसुब (थायलंड), 3. बॅचीमेग बडामसुरेन (मंगोलिया).
महिला फिटनेस फिजीक (165 से.मी.वरील)- 1. रूंगतवान जिंदासिंग (थायलंड), 2. फोंडचनोक प्लुमजित (थायलंड), 3. श्रेयशी दास चौधरी (भारत).
ज्यूनियर शरीरसौष्ठव (75 किलो)- 1. इफाम मोहम्मद वश्मीर खान (भारत), 2. न्यामसुरेन चिनझोरिग ( मंगोलिया), 3. नाथाफाँग येनगुलीयाम (थायलंड).
ज्यूनियर शरीरसौष्ठव (75 किलोवरील)- 1. अफिचाल वांडी (थायलंड), 2. हमीद घोफरानी (इराण), 3. मोहम्मदहदी यझदानी (इराण)