मुंबई:  तब्बल आठ वर्षांपूर्वी शेवटची कसोटी आणि चार वर्षांपूर्वी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळलेल्या विकेटकीपर पार्थिव पटेलचं नशिब चमकलं आहे. कारण इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी पार्थिव पटेलचा भारताच्या कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे.


रिद्धीमान साहाला दुखापत झाल्यामुळे तो इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही.

इंग्लंडविरुद्धच्या उर्वरीत तीन कसोटी सामन्यांसाठी कालच भारतीय संघाची घोषणा झाली. भारताच्या सोळा सदस्यीय संघातून सलामीवीर गौतम गंभीरला डच्चू देण्यात आला आहे. त्याच्याऐवजी संघात वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचा समावेश करण्यात आला आहे.

रिद्धीमान साहाला दुखापत

हा निर्णय झाल्यानंतर बीसीसीआयने तब्बल 15 तासांनी पार्थिव पटेलचाही टीम इंडियात समावेश झाल्याची घोषणा केली.

रिद्धीमान साहाच्या मांडीला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो तिसऱ्या कसोटीत खेळू शकणार नाही. त्याच्याऐवजी पार्थिव पटेल मैदानात उतरणार आहे.

पार्थिव पटेलने 2002 मध्ये पहिली कसोटी खेळली होती. त्यावेळी त्याचं वय 17 वर्ष 153 दिवस होतं. त्यामुळे तो कसोटी खेळणारा सर्वात तरुण विकेटकीपर ठरला होता. मात्र आता कोहलीच्या नेतृत्त्वातील टीम इंडियातील तो दुसऱ्या क्रमांकाचा वयस्कर क्रिकेटपटू असेल. सध्या त्याने 31 वर्ष पूर्ण केली आहेत.

पार्थिव पटेलसमोर 19 वर्षीय रिषभ पंतचं मोठं आव्हान होतं. रिषभने नुकतंच रणजी चषकात त्रिशतक झळकावलं होतं. इतकंच नाही तर रणजी सामन्यातील जलद शतकाची नोंदही त्याच्याच नावावर आहे. रिषभने 48 चेंडूत शतक ठोकलं होतं.

पंतशिवाय मध्यप्रदेशचा रणजीपटू नमन ओझाही या शर्यतीत होता. मात्र दुखापतीमुळे त्याचंही नाव मागे पडलं.   तसंच तामीळनाडूचा दिनेश कार्तिक हा पर्यायही निवड समितीसमोर होता. मात्र पार्थिव पटेलने या सर्वांना मागे टाकत टीम इंडियात पुनरागमन केलं.

संबंधित बातम्या

गंभीरला भारताच्या कसोटी संघातून डच्चू, भुवीचा समावेश

कसोटी कर्णधार विराट कोहलीवर मोठा आरोप

कोहलीची लांब उडी, रँकिंगमध्ये 14 वरुन चौथ्या स्थानी

तिसऱ्या कसोटीतून ब्रॉड आऊट, इंग्लंडला मोठा धक्का

जयंतनं कानमंत्र दिला अन् शमी चमकला!