कराची : पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर आमिर हानिफ याचा मुलगा मोहम्मद जारयब याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. क्रिकेट करिअरमधील नैराश्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचं बोललं जातं आहेत.

मागील महिन्यात लाहौरमधील एका अंडर-19 टूर्नामेंटसाठी जारयबची कराचीच्या संघात निवड करण्यात आली होती. पण ऐनवेळी तो दुखापतग्रस्त असल्याचं सांगत त्याला संघातून वगळण्यात आलं होतं. तेव्हापासूनच तो प्रचंड नैराश्यात होता. याच नैराश्यातून त्याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं.

पाकिस्तानसाठी पाच वनडे खेळलेल्या आमिर हनीफ यांनी द एक्सप्रेस ट्रिब्यूनला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, 'त्याला झालेली दुखापत फार गंभीर नव्हती. पण टीम मॅनेजमेंटने त्याला अचानक संघातून बाहेर काढलं. ज्यामुळे तो खूप निराश होता. माझ्या मुलासोबत खूप अन्याय झाला. त्याला न्याय मिळायला हवा.' अशी मागणी अमीर हनीफ यांनी केली आहे.

'माझ्या मुलासोबत जे झालं तसं कोणत्याही क्रिकेटरसोबत होऊ नये अशी माझी इच्छा आहे. अंडर-19 मध्ये माझ्या मुलावर प्रचंड दबाव होता. ज्यामुळे तो नैराश्याच्या गर्तेत गेला होता. मी त्याला समजवण्याचा बराच प्रयत्न केला होता. पण तरीही त्याने हे टोकाचं पाऊल उचललं.' असंही हनीफ यावेळी म्हणाले.