नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना रविवारी खेळवण्यात येत आहे. हा सामना सुरु होण्यास काही तास राहिले आहेत.


महामुकाबल्यानिमित्त दोन्ही बाजूचं वातावरण तापलं असताना, तिकडे पाकिस्तानी चाहत्यांची हुल्लडबाजी समोर आली आहे.

पाकिस्तानी चाहत्यांनी टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची गाडी अडवून ठेवली. इतकंच नाही तर त्यांनी घोषणाबाजी करत, गांगुलीच्या गाडीवर पाकिस्तानी झेंडे फडकावले.

ही घटना 14 जूनला घडली. गांगुली पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील सामना पाहण्यासाठी कार्डिफच्या मैदानावर गेला होता. सामना झाल्यानंतर तो मैदानावरुन बाहेर आला, त्यावेळी गाडीतून येणाऱ्या गांगुलीला पाहून, पाकिस्तानी चाहत्यांनी गांगुलीच्या गाडीला घेराव घातला. त्याची गाडी पुढेच जाऊ दिली नाही.

पाकिस्तानच्या बाजूने घोषणाबाजी

शेकडो पाकिस्तानी चाहत्यांनी जवळपास 2 मिनिटे गांगुलीच्या गाडीला घेराव घातला. यावेळी पाक प्रेक्षकांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत, गांगुलीच्या गाडीवर पाकिस्तानी झेंडे फडकावले. तसंच गांगुलीच्या गाडीवर थापाही मारल्या.

गांगुलीचा संयम

हा सर्व प्रकार सुरु असताना, सौरव गांगुलीने एकदाही संयम ढळू दिला नाही. गांगुलीने पाकिस्तानी चाहत्यांकडे पाहून स्मित हास्य करत निघून जाणं पसंत केलं.