लाहोर : पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज नासीर जमशेदवर बारा महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तान सुपर लीगदरम्यान स्पॉट फिक्सिंग प्रकरणी तो दोषी आढळला आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बंदी घालण्यात आलेला तो पाचवा पाकिस्तानी खेळाडू ठरला.
खेळाडू आणि बुकी यांच्यात मध्यस्थी केल्याचा जमशेदवर आरोप आहे. मात्र त्याने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) कायदेशीर सल्लागार तफझुल रिझवी यांनी या निर्णयाची माहिती दिली. चौकशी चालू असल्याचंही त्यांनी सांगितलं.
न्यायालयाच्या तीन न्यामूर्तींच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. चौकशीत सहकार्य न केल्याबद्दल त्याच्यावर बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती रिझवी यांनी माध्यमांना दिली.
दरम्यान पीसीबीने जमशेदवर अजून कोणताही आरोप लावलेला नाही. कारण या प्रकरणाची इंग्लंडमध्ये चौकशी चालू आहे, अशीही माहिती रिझवी यांनी दिली.
स्पॉट फिक्सिंगच्या आरोपांनंतर इंग्लंडमधील राष्ट्रीय गुन्हे अन्वेशन विभागाने जमशेद आणि एका अज्ञाताला पाच दिवसांसाठी ताब्यात घेतलं होतं. फेब्रुवारीत झालेल्या पाकिस्तान क्रिकेट लीगच्या दुसऱ्या सीझनदरम्यान हे आरोप करण्यात आले होते.
पाकिस्तानचा माजी सलामीवीर शरजील खानवर याच प्रकरणात पाच वर्षांची बंद घालण्यात आली होती. नंतर ती शिक्षा अडीच वर्षांची करण्यात आली. तर त्याचाच सहकारी खलीद लतीफवरही पाच वर्षांची बंदी आणि दंड ठोठावण्यात आला आहे.
पीएसएलमधील इस्लामाबाद युनायटेड विरुद्ध पेशावर झालमी यांच्यात झालेल्या सामन्या दरम्यान दोन डॉट बॉल खेळल्याचा आरोप शरजील खानवर होता. तर लतीफ खानने या स्पॉट फिक्सिंगसाठी मध्यस्थी केल्याचा आरोप आहे.