नवी दिल्ली: भारताविरुद्धचे अनेक हॉकी सामने हिसकावणारा पाकिस्तानचा दिग्गज माजी हॉकीपट्टू सध्या अंथरुणाला खिळला आहे. मन्सूर अहमद सध्या हृदयरोगाने त्रस्त आहे. त्यामुळे मन्सूर अहमद यांनी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी भारत सरकार आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे विनवणी केली आहे.


हॉकी विश्वचषक विजेत्या पाकिस्तानी संघात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या मन्सूर अहमद यांना हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी भारतात यायचं आहे. त्यासाठी त्यांनी भारत सरकारकडून व्हिजा मिळावा अशी विनंती एका व्हिडीओद्वारे केली आहे.

सुषमा स्वराज यांनी मेडिकल व्हिजा द्यावा, अशी विनंती मन्सूर अहमद यांनी केली आहे.

अत्यंत भावूक होऊन मन्सूर अली यांनी व्हिडीओ जारी केला आहे.

“भारताविरुद्धच्या हॉकी सामन्यात मी अनेकवेळा भारतीयांची मनं दुखावली. अनेकवेळा मी भारताचा विजय हिसकावून पाकिस्तानला विजय मिळवून दिला. मात्र तो खेळाचा भाग होता. आता मला माझ्या हृदयशस्त्रक्रियेसाठी भारत सरकारची मदत हवी आहे.

भारत सरकारचा ‘मेडिकल व्हिजा’ माझं आयुष्य वाचवू शकेल. मानवताच सर्वश्रेष्ठ आहे. भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध ताणलेले आहेत. मात्र खेळाने ही दरी अनेकवेळा दूर केली आहे. यावेळीही होईल” असं मन्सूर अहमद यांनी म्हटलं आहे.

VIDEO: