आजचा सामना जिंकून इंग्लंडने 12 गुणांसह गुणतालिकेत तिसरे स्थान मिळवले आहे. तर न्यूझीलंड 11 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचा नेट रनरेट +0.175 आहे. तर पाकिस्तान 9 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. परंतु पाकिस्तानचा नेट रनरेट -0.792 इतका आहे. त्यामुळे पाकिस्तानने बांग्लादेशविरुद्धचा सामना जिंकून 11 गुण कमावले तरी, नेट रनरेट न्यूझीलंडपेक्षा कमी असल्याने पाकिस्तान उपांत्य फेरीत प्रवेश करु शकणार नाही.
उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी पाकिस्तानला बांग्लादेशवर मोठा विजय मिळवावा लागेल. प्रचंड धावांच्या फरकाने बांग्लादेशला हरवावं लागणार आहे. त्यासाठी पाकिस्तानला पहिली फलंदाजी करणे अनिवार्य आहे. म्हणूनच सामन्याच्या सुरुवातीला पाकिस्तानला टॉस जिंकावा लागेल. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घ्यावी लागेल.
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने या सामन्यात 400 धावांची मजल मारली, तर बांगलादेशला 84 धावांत गुंडाळून त्यांना 316 धावांनी विजय मिळवणे आवश्यक आहे. पाकिस्तानने जर या सामन्यात 350 धावांची मजल मारली, तर बांगलादेशला 38 धावांत गुंडाळून, त्यांना 312 धावांनी विजय मिळवणे आवश्यक आहे. तरच पाकिस्तानचा नेट रनरेट न्यूझीलंडपेक्षा चांगला होईल. त्याच्या जोरावर उपांत्य फेरीत प्रवेशदेखील मिळेल.
जर पाकिस्तानला धावांचा पाठलाग करावा लागला, तर त्या विजयाचे अंतर नेट रनरेटसाठी उपयोगी ठरणार नाही. पाकिस्तानने एकही विकेट न गमावता बांग्लादेशने दिलेले आव्हान पार केले तरी पाकिस्तानचा नेट रनरेट न्यूझीलंडपेक्षा चांगला होऊ शकत नाही. त्यामुळे पाकिस्तानला त्यांचा गाशा गुंडाळावा लागणार आहे.