इस्लामाबाद : पाकिस्तान क्रिकेट संघाने (Pakistan Cricket Team) या विश्वचषकात (World Cup) चांगली कामगिरी केलेली नाही. संघ या विश्वचषकातून बाहेर पडला आहे. अशा स्थितीत पाकिस्तानात परतल्यानंतर बाबर आझमला (Babar Azam) या खराब कामगिरीमुळे सर्वात मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. या विश्वचषकानंतर बाबर आझम कर्णधारपद सोडेल, असा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे.


विश्वचषकाच्या काही महिन्यांपूर्वीपर्यंत पाकिस्तानकडे बलाढ्य संघ म्हणून पाहिले जात होते. मात्र, विश्वचषकापूर्वी झालेल्या आशिया चषकात पाकिस्तानचा संघ उघडा पडला आणि अंतिम फेरीतही पोहोचू शकला नाही. त्यानंतर, पाकिस्तानने विश्वचषकातील पहिले दोन सामने जिंकले, परंतु त्यानंतर भारत, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवामुळे पाकिस्तान या विश्वचषकातून बाहेर होण्याच्या मार्गावर आला. मात्र, सलग 4 सामने गमावल्यानंतर पाकिस्तानने बांगलादेश आणि न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवून पुनरागमन केले, मात्र ते उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी पुरेसे ठरले नाहीत.






वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर काय होईल?


सध्या पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघांमध्ये उपांत्य फेरी गाठण्यासाठी घोडदौड सुरू आहे, मात्र त्या शर्यतीत न्यूझीलंड नेट रनरेटच्या आधारावर खूप पुढे आहे. पाकिस्तान संघाचा शेवटचा साखळी सामना इंग्लंडविरुद्ध आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याने आता पाकिस्तानसाठी उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग संपला आहे. अशा स्थितीत बाबर आझमचा संघ विश्वचषकातून बाहेर पडणार हे जवळपास निश्चित झाले आहे.


अशा परिस्थितीत बाबरचे कर्णधारपद हा पाकिस्तान क्रिकेट बोर्डात चर्चेचा मुख्य विषय बनू शकतो. मात्र, काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानची ड्रेसिंग रुमही कर्णधारपदाच्या बाबतीत दोन भागात विभागली गेली आहे. एका भागाला बाबर हवा आहे, तर दुसऱ्या भागाला शाहीन शाह आफ्रिदी हवा आहे. मात्र, याबाबत निश्चित काहीही सांगता येणार नाही.


पाकिस्तानचे अनेक वरिष्ठ खेळाडूही बाबर आझमला वेगवेगळ्या पद्धतींचा सल्ला देत आहेत, ज्यावर बाबरने इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या लीग सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत सांगितले की, "प्रत्येकाचा स्वतःचा दृष्टीकोन असतो, विचार करण्याची पद्धत असते- प्रत्येकाचा स्वतःचा मार्ग असतो, तसंच असायला हवं. तुम्हाला काही सल्ला द्यायचा असेल तर प्रत्येकाकडे माझा नंबर आहे. टीव्हीवर बसून सल्ला देणं सोपं आहे. तुम्ही मला मेसेजही करू शकता."






मात्र, पाकिस्तानी वृत्तवाहिनी जिओ सुपरच्या वृत्तानुसार, बाबर आझम विश्वचषकानंतर एकदिवसीय आणि टी-२० फॉरमॅटचे कर्णधारपद सोडू शकतात. मात्र, याबाबत बाबर किंवा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.


इतर महत्वाच्या बातम्या