कार्डिफ : कर्णधार सरफराज अहमद आणि मोहम्मद आमिरनं सातव्या विकेटसाठी रचलेल्या 75 धावांच्या अभेद्य भागिदारीनं पाकिस्तानला श्रीलंकेवर तीन विकेट्सनी विजय मिळवून दिला. या विजयानं पाकिस्तानला उपांत्य फेरीचं तिकीट मिळवून दिलं.
आता 14 जूनच्या उपांत्य फेरीत पाकिस्तानचा सामना यजमान इंग्लंडशी होईल. दरम्यान, ब गटातल्या अखेरच्या साखळी सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांनी श्रीलंकेचा डाव अवघ्या 236 धावांत गुंडाळला होता.
या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचीही सात बाद 162 अशी घसरगुंडी उडाली होती. त्या परिस्थितीत सरफराज अहमदनं मोहम्मद आमिरच्या साथीनं 75 धावांची अभेद्य भागीदारी रचून पाकिस्तानला सनसनाटी विजय मिळवून दिला.
दरम्यान, टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करताना पाकिस्तानी गोलंदाजांनी निर्विवाद वर्चस्व गाजवलं. पाकिस्तानच्या प्रभावी आक्रमणासमोर श्रीलंकेचा अख्खा डाव 236 धावांत आटोपला.
पाकिस्तानच्या जुनैद खान आणि हसन अलीनं श्रीलंकेच्या प्रत्येकी तीन फलंदाजांना माघारी धाडलं. मोहम्मद आमिर आणि फहिम अश्रफनं प्रत्येकी दोन विकेट्स काढल्या.
उपांत्य फेरीचे सामने :
14 जून : इंग्लंड वि. पाकिस्तान
15 जून : भारत वि. बांगलादेश