पोर्ट ऑफ स्पेन : टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यातली चौथी आणि अखेरची कसोटी अखेर पावसात वाहून गेली. पोर्ट ऑफ स्पेन कसोटीत पहिल्या दिवशी केवळ 22 षटकांचाच खेळ होऊ शकला होता. त्यानंतर आलेल्या पावसाने या कसोटीत एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही. त्यामुळे ही कसोटी अनिर्णीत राहिली आणि भारताने विंडीज दौऱ्यातली चार कसोटी सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली.

 

पण मालिका जिंकूनही टीम इंडियाला त्या विजयाचा आयसीसी क्रमवारीत लाभ मिळू शकला नाही. या मालिकेतली अखेरची कसोटी अनिर्णीत राहिल्याने त्याचा फटका भारतीय संघाला बसला. टीम इंडियाची आयसीसी कसोटी क्रमवारीत पाकिस्तानने भारताला मागे टाकत अव्वल स्थानावर कब्जा केला.

 

कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या स्थानावर झेप घेण्याची पाकिस्तानची ही पहिलीच वेळ आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतली अखेरची कसोटी अनिर्णीत राहिल्याने टीम इंडियाची आयसीसी कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर घसरण झाली. 111 गुणांसह आयसीसी कसोटी क्रमवारीत पाकिस्तानने अव्वल स्थान मिळवलं. तर टीम इंडिया 110 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.