नोकरीचं आमिष दाखवून ठाण्यातील सुमारे 800 तरुणांना गंडा
एबीपी माझा वेब टीम | 22 Aug 2016 12:21 PM (IST)
ठाणे : नोकरीचं आमिष दाखवून सुमारे 800 तरुणांना गंडा घातल्याचा प्रकार ठाण्यात उघडकीस आला आहे. मनोज कुमार आणि छाया सिंग ही जोडगोळी सध्या फरार असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच दोघांनी पीसी टेक्नॉलॉजी या कंपनीची देशभरातील सुमारे 10 शाखा आज सकाळ पासून अचानकपणे बंद झाल्या आहेत. ठाण्याच्या वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात फसवणुकीला बळ पडलेले तरुण हताश आणि निराश होऊन जमले आहेत. कारण कॉलेज संपल्या संपल्या नोकरी लागल्यानं हे सगळे खुशीत होते, मात्र फसवले गेल्याच लक्षात आल्याने त्यांना धक्का बसला आहे. पीसी टेक्नॉलॉजी या कंपनीच्या माध्यमातून मनोज कुमार आणि छाया सिंग यांनी अनेक कॉलेजवर जाऊन मुलांच्या मुलाखती घेतल्या. पण सगळ्यांना अट घालण्यात आली ती 25 हजार रुपये डिपॉझिट देण्याची. ज्या विद्यार्थ्यांनी डिपॉझिट दिल त्यांची निवड करण्यात आली. या मुलांना पगार देण्याच आश्वासनही देण्यात आली होत. पण कोणालाही असा पगार देण्यात आला नाही. पीसी टेक्नॉलॉजी ही कंपनी आणि तिचे मालक मनोज कुमार आणि छाया सिंग हे पश्चिम बंगालचे आहेत. महत्वाचं म्हणजे या दोघांनीही एचआरच्या नावाने बहुतेक व्यवहार केले आहेत. यामुळे मनोज आणि छाया हे या प्रकरणात अडकण्याची शक्यता कमीच आहे, तसेच या दोघांना पकडण्याचं मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. ठाण्याच्या वागळे इस्टेट भागातल्या अशर आयटी पार्कमध्ये पीसी टेक्नॉलॉजीने आपलं ऑफिस उघडलं होतं. पण जागेच्या मालकालाही मनोज कुमार आणि छाया सिंग या दोघांनी भाडं न देता फसवले. या मुलांना अपेक्षा आहे की, आम्ही फसवले गेलो, पण किमान अन्य कोणावर अशी वेळ येऊ नये. शिवाय, नोकरीला लागताना कम्पनीची नीट माहिती घेणं गरजेच आहे. अन्यथा अशी फसवणूक होऊ शकते.