चेन्नई : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफला 23 ऑक्टोबर विसरु द्यायचा नाही, असा कडाडून प्रहार सलग दुसऱ्या वर्षी झाला आहे. गेल्यावर्षी 23 ऑक्टोबर 2022 रोजीच्या सामन्यात किंग कोहलीने हॅरिस रौफला मारलेला अफलातून सिक्स हा क्रिकेटच्या इतिहासातील मास्टरस्ट्रोक होता. सोशल मीडियात किंग कोहलीच्या सिक्स व्हिडिओ शेअर करत हॅरिस रौफ आणि पाकिस्तानला ट्रोल करण्यात येत असतानाच आज पुन्हा 23 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानच्या रहमदुल्लाह गुरबाजने रौफला फोडून काढले.
रौफ गोलंदाजीला आल्यानंतर त्याने पहिल्याच षटकात गुरबाजने चार खणखणीत चौकार ठोकत स्वागत केले. त्यामुळे टीम इंडियाविरुद्ध झालेल्या धुलाईची आठवण झाली. आशिया कपमध्ये रोहितकडे पाहून हावभाव करणाऱ्या हॅरिस रौफला याच वर्ल्डकप रोहितने पार हवा काढून घेतल्यानंतर चेहरा पार काळवंडला होता. आज तीच अवस्था गुरबाजने केली. त्यामुळे हंगामा चित्रपटात राजपाल यादवची जेवढी धुलाई झाली नाही, तेवढी धुलाई स्पर्धेत रौफची होत आहे. अफगाणिस्तानच्या दोन्ही सलामीवीरांनी जबरदस्त फलंदाजी करताना अर्धशतके झळकावली.
पाकिस्तानने अफगाणिस्तानला जिंकण्यासाठी 283 धावांचे लक्ष्य ठेवले
तत्पूर्वी, पाकिस्तानने अफगाणिस्तानला जिंकण्यासाठी 283 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 50 षटकांत 7 गडी गमावून 282 धावा केल्या. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने 92 चेंडूत सर्वाधिक 74 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 1 षटकार लगावला. याशिवाय सलामीवीर अब्दुल्ला शफीकने 50 धावांचा टप्पा ओलांडला. अब्दुल्ला शफीकने 75 चेंडूत 58 धावा केल्या. या सलामीवीराने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 2 षटकार मारले. तत्पूर्वी, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली होती. पाकिस्तानचे सलामीवीर अब्दुल्ला शफीक आणि इमाम उल हक यांनी 10.1 षटकात 56 धावा जोडल्या. इमाम उल हक 22 चेंडूत 17 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याचवेळी विश्वचषकात सतत धावा करत असलेला पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान 10 चेंडूत 8 धावा करून गेला. सौद शकीलने 34 चेंडूत 25 धावांचे योगदान दिले.
इफ्तिखार अहमद आणि शादाब खान यांनी शेवटच्या षटकांमध्ये शानदार फलंदाजी केली. इफ्तिखार अहमद आणि शादाब खान यांच्यात ७३ धावांची भागीदारी झाली. इफ्तिखार अहमदने 27 चेंडूत 40 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 2 चौकार आणि 4 षटकार मारले. तर शादाब खानने 38 चेंडूत 40 धावा केल्या.
अफगाणिस्तानच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर नूर अहमद हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. नूर अहमदने 10 षटकांत 49 धावा देत तीन खेळाडूंना आपला बळी बनवले. नवीन उल हकने पाकिस्तानच्या 2 फलंदाजांना बाद केले. याशिवाय मोहम्मद नबी आणि अजमतुल्ला उमरझाई यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
अफगाणिस्तान जिंकल्यास गुणतालिकेत मोठा बदल होणार!
बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. पाकिस्तानी संघाने आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत, ज्यात 2 जिंकले आहेत, तर 2 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशा प्रकारे पाकिस्तानचे 4 सामन्यांत 4 गुण झाले आहेत. त्याचबरोबर अफगाणिस्तान गुणतालिकेत दहाव्या स्थानावर आहे. अफगाणिस्तानने आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत, ज्यात फक्त 1 जिंकला आहे, तर 3 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशा प्रकारे अफगाणिस्तानचे 4 सामन्यांत 2 गुण झाले आहेत. अफगाणिस्तानचा संघ हा सामना जिंकल्यास इंग्लंड, श्रीलंका, नेदरलँड आणि बांगलादेश या संघांना मागे टाकेल.
इतर महत्वाच्या बातम्या