या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार आणि विकेटकीपर सरफराज अहमदने टीम इंडियाचा माजी कर्णधार धोनीचा कित्ता गिरवण्याचा प्रयत्न केला. मात्र धोनी हा धोनी आहे, सरफराजलाच काय कोणत्याही देशाच्या विकेटकीपरला धोनीसारखी कामगिरी करणं तितकं सोपं नाही.
धोनीप्रमाणे सरफराजनेही विकेटकीपिंग सोडून गोलंदाजी करायला गेला आणि फसला.
झिम्बाब्वेच्या 48 व्या षटकात सरफराजने ग्लोव्ज काढून चेंडू हातात घेतला. त्याने विकेटकीपिंगसाठी फखर झमानला पाचारण केलं आणि स्वत: गोलंदाजीसाठी गेला.
करियरमधील पहिली ओव्हर टाकण्यासाठी आलेल्या सरफराजला एकही विकेट मिळाली नाही. पहिल्या ओव्हरमध्ये त्याने केवळ 6 धावा दिल्या. मात्र पुन्हा एकदा तो गोलंदाजीसाठी आला. या षटकात झिम्बाब्वेचा तळाचा फलंदाज पीटर मूरने मिडविकेटवरुन असा काही षटकार ठोकला, की दोन्ही संघाचे खेळाडू बघत बसले. सरफराजने दोन षटकात 15 धावा दिल्या. मात्र त्याला एकही विकेट घेता आली नाही.
यापूर्वी टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने 2009 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत विकेटकीपिंग सोडून गोलंदाजी केली होती. त्यावेळी धोनी विकेट घेण्यात यशस्वी झाला होता.
दरम्यान, पाकिस्तानी संघाने सरफराजच्या नेतृत्त्वात झिम्बाब्वेवर 5-0 असा विजय मिळवला.