ग्वांगझू : भारताच्या ऑलिम्पिक आणि जागतिक रौप्यविजेत्या बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूनं ग्वांगझूमधल्या वर्ल्ड टूर फायनल्सच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. तिनं अंतिम फेरीत जपानच्या नोझोमी ओकुहाराचं कडवं आव्हान 21-19, 21-17 असं मोडीत काढलं. सिंधूचं वर्ल्ड टूर फायनल्सचं हे पहिलंच विजेतेपद ठरलं. याआधी 2017 च्या वर्ल्ड टूर फायनल्समध्ये सिंधूला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं.

सिंधूचा हा कारकिर्दीतील 300 वा विजय ठरला. सलग सात पराभवानंतर अखेर सिंधूने आज विजेतेपद पटकावले. या वर्षात सिंधूने एकही विजेतेपद जिंकले नव्हते. त्यामुळे हे विजेतेपद पटकावून तिने हंगामाचा शेवट गोड केला आहे.

काल सिंधूने उपांत्य फेरीत रॅट्चनॉक इंटानॉन हिला 21-16, 25-23 असे पराभूत केले होते. पहिला गेम सिंधूने सहज जिंकला होता. पण दुसऱ्या गेममध्ये इंटानॉनने कडवी झुंज दिली.  त्याआधी तिने उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या झँग बीवन हिला 21-9, 21-15 अशा सरळ गेममध्ये पराभूत केले. पहिल्या गेममध्ये सिंधूने बीवन हिला 21-9 अशा मोठ्या फरकाने पराभूत केले आणि सामन्यात आघाडी घेतली. त्यानंतर बीवनने सिंधूला दुसऱ्या गेममध्ये चांगली टक्कर दिली. पण अखेर सिंधूच्या अनुभवापुढे तिचे प्रयत्न फोल ठरले. दुसरा गेम २१-१५ असा जिंकत तिने उपांत्य फेरीत धडक मारली होती.