मुंबई : टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने वन डे आणि टी-20 क्रिकेट संघाचं कर्णधारपद सोडलं. 6 जानेवारी रोजी इंग्लंडविरुद्ध सुरु होणाऱ्या वन डे आणि टी-20 मालिकेसाठी नव्या कर्णधाराची घोषणा होणार असून विराट कोहलीकडे ही जबाबदारी देणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे.


धोनीने नागपूरमध्ये बीसीसीआय आणि निवड समितीला त्याच्या निर्णयाची माहिती दिली. त्यामुळे धोनीने कर्णधारपद सोडलं असलं तरी टीमचा सदस्य म्हणून तो खेळत राहणार आहे.

283 वन डे सामन्यात धोनीचा विक्रम उत्तम आहे. त्याची सरासरी 51 च्या जवळपास आहे. त्याच्या नावावर 9110 धावा जमा आहेत. ज्यात 9 शतकं आणि 61 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 183 धावा आहेत.

विशेष म्हणजे निर्धारित 50 षटकांच्या या फॉरमॅटमध्ये धोनीने बहुतांश सामन्यात सहाव्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. या क्रमांकवर फलंदाजांना धावा करण्याची संधी फारच कमी असते.

सहाव्या क्रमांकावर 1 शतक आणि 26 अर्धशतकांचा पाऊस

धोनी 112 सामन्यांमध्ये सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे. त्याने 45.16च्या सरासरीने 3613 धावा केल्या आहे. यामध्ये एक शतक आणि 26 अर्धशतकांचा समावेश आहे.

पाचव्या क्रमांकावर सर्वाधिक फलंदाजी

यानंतर त्याने पाचव्या क्रमांकावर सर्वाधिक वेळा फलंदाजी केली आहे. या क्रमांकावर त्याने 59 सामन्यात 52.72 च्या सरासरीने 2320 धावा केल्या आहे. पाचव्या क्रमांकावर खेळताने धोनीने तीन शतकं आणि 12 अर्धशतकं ठोकली आहेत.

चौथ्या क्रमांकावर खेळताना 1290 धावा

धोनीने चौथ्या नंबरवर 26 वन डे सामन्यात फलंदाजी केली आहे. इथे त्याची सरासरी 58.23 आहे. या क्रमावर खेळताना धोनीने एक शतक आणि 11 अर्धशतकांच्या मदतीने 1290 धावा केल्या आहेत.

तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दमदार कामगिरी

तर तिसऱ्या क्रमांकावरील रेकॉर्डमुळे धोनाची गणना जगातील उत्कृष्ट फलदांजांमध्ये होते. धोनीने या क्रमांकावर मैदानात उतरुन 16 सामन्यांमध्ये 996 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी तब्बल 82.75 आहे. यात दोन शतकं आणि सहा अधशतकं आहेत.

धोनीने त्याच्या कारकीर्दीतील सर्वोच्च खेळीही याच क्रमांकावर उतरुन केली होती. 31 ऑक्टोबर 2005 ला जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियममध्ये श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर खेळताना 145 चेंडूत 183 धावांची तुफानी खेळी रचली होती. धोनीने या खेळीत 10 षटकार आणि 15 चौकार ठोकले होते.

धोनीच्या फलंदाजीचा क्रम जसजसा वर जातो, तसतसं त्याच्या बॅटमधून खोऱ्याने धावा निघतात, असं आकड्यावरुन स्पष्ट होतं.

त्यामुळे आता नवा कर्णधार विराट कोहली धोनीला कोणत्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरवणार हे पाहणं उत्सुकतेचं असेल.