नवी दिल्ली : भारताची पैलवान विनेश फोगाटला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीपूर्वी 50 किलो वजनी गटात नियमापेक्षा अधिक वजन असल्यानं निलंबित करण्यात आलं होतं. या निर्णयाच्या विरोधात कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टसमध्ये विनेश फोगाटनं याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर काल CAS कडून निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये विनेश फोगाटची याचिका फेटाळण्यात (Vinesh Phogat Petition Dismissed ) आल्याचं स्पष्ट झालं. याचिका फेटाळली गेल्यानं विनेश फोगाटची रौप्य पदकाची आशा देखील संपुष्टात आली. यानंतर विनेश फोगाटनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर आणि फेसबुकवर पहिली पोस्ट केली आहे. यामध्ये तिनं फक्त एक फोटो पोस्ट केला आहे. यासोबत तिनं बॅकग्राऊंड म्यूझिकला रब्बा वे हे पंजाबी गाणं ठेवलं आहे.

  


विनेश फोगाटला निलंबित करण्यात आल्यानं तिच्यासह भारतीयांना मोठा धक्का बसला होता. यानंतर विनेश फोगाटला किमान CAS मध्ये न्याय मिळेल, अशी आशा क्रीडा प्रेमींना होती. मात्र, CAS नं विनेश फोगाटची याचिका फेटाळली अन् पदकाची अखेरची आशा देखील संपली. यानंतर विनेश फोगाटनं एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्यानंतर यावर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.  


विनेश फोगाटनं या पोस्टसोबत कॅप्शन लिहिलेलं नाही. मात्र, नेटकरी विनेश फोगाटचं मनोबल वाढवण्यासाठी कमेंट करुन दिलासा देत असल्याचं पाहायला मिळतं. भारताची टेबल टेनिस खेळाडू मनिका बत्रानं कमेंट केली आहे. तिनं म्हटलं की, "तू प्रेरणादायी आहेस, कौतुकाची दावेदार आहे, तू भारताचं रत्न आहेस, अशी कमेंट मनिका बत्रानं केली आहे. तिच्यासह अनेक जण विनेश फोगाटच्या पोस्टवर कमेंट करत आहेत.  


रौप्य पदकाची आशा संपली...


विनेश फोगाटनं कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टसमध्ये रौप्य पदकासाठी याचिका केली होती. 9 तारखेला सुनावणी झाल्यानंतर निकाल जाहीर होण्यास वेळ लावला जात होता. अखेर काल सीएएसनं विनेश फोगाटची याचिका फेटाळली आणि रौप्य पदकाची आशा संपली. 


विनेश फोगाटनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एका दिवसात तीन सामने जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. अंतिम फेरीपूर्वी वजनाची चाचणी करण्यात आली त्यामध्ये विनेश फोगाटचं वजन 100 ग्रॅमनं अधिक नोंदवलं गेलं. त्यामुळं तिला निलंबित करण्यात आलं. विनेश फोगाटनं या संपूर्ण घडामोडींनंतर निवृत्ती जाहीर केली होती. 


दरम्यान, विनेश फोगाटनं राष्ट्रकुल स्पर्धेत तीन सुवर्णपदकं जिंकली आहेत. तर, आशियाई क्रीडा स्पर्धेत 2018 मध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं. 



संबंधित बातम्या :


Vinesh Phogat : विनेश फोगाटला मोठा धक्का, CAS नं याचिका फेटाळली, रौप्य पदकाची आशा संपुष्टात


Vinesh Phogat : CAS च्या निकालाबाबत तारीख पे तारीख सुरु, विनेश फोगाटच्या याचिकेवर निकाल कधी येणार? नवी माहिती समोर