Vinesh Phogat Disqualified Paris Olympics 2024: भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने (Vinesh Phogat) इतिहास घडवला अन आजवरच्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत (Paris Olympics 2024) अंतिम फेरीत धडक मारणारी ती पहिली महिला कुस्तीपटू ठरली. विनेश आज भारताला यंदाचं पहिलं सुवर्णपदक ही मिळवून देईल, अशी आशा प्रत्येक भारतीयाला होती. मात्र हा आनंद आजच्या सकाळने हिरावून घेतला. कारण कालच्या पेक्षा विनेशचे आजचे वनज 100 ग्रॅम जास्त आढळल्यानं, ऑलिम्पिकने तिला अपात्र ठरवले. 


विनेश फोगाटला ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरवल्यानंतर तिचं एक जुनं ट्विट व्हायरल होत आहे. 12 जुलै 2024 रोजी विनेश फोगाटने हे ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये बृजभूषण सिंह आणि संजय सिंग मला ऑलिम्पिकमध्ये खेळण्यापासून रोखण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करत आहेत. नियुक्त केलेले प्रशिक्षक हे सर्व ब्रिजभूषण आणि त्यांच्या संघाचे आवडते आहेत, त्यामुळे माझ्या सामन्यादरम्यान ते माझ्या पाण्यात काहीतरी मिसळणार तर नाही ना?, असा सवाल विनेश फोगाटने या ट्विटद्वारे उपस्थित केला होता. 


आवाज उठवण्याची हीच शिक्षा आहे का?


आमचा मानसिक छळ करण्यात कोणतीही कसर सोडली जात नाही. एवढ्या महत्त्वाच्या स्पर्धेपूर्वी असा मानसिक छळ करणे कितपत न्याय्य आहे? लैंगिक छळाच्या विरोधात आम्ही आवाज उठवला म्हणून देशासाठी खेळायला जाण्याआधीच आमच्यासोबत राजकारण होतंय का? आपल्या देशात चुकीच्या विरोधात आवाज उठवण्याची हीच शिक्षा आहे का?, मला आशा आहे की आम्ही देशासाठी खेळायला जाण्यापूर्वी आम्हाला न्याय मिळेल, असंही विनेश फोगाटने ट्विटमध्ये म्हटलं आहे. 






पंतप्रधान मोदींनी फोन फिरवला-


विनेश फोगाटला अपात्र ठरवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष पीटी उषा यांच्याशी चर्चा केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी पीटी उषा यांच्याकडून या विषयावर आणि विनेशला अपात्र ठरवल्यानंतर आता भारताकडे कोणते पर्याय आहेत याबद्दल प्राथमिक माहिती घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पंतप्रधान मोदींनी पी. टी. उषा यांना विनेश फोगटच्या प्रकरणात तिला मदत करण्यासाठी सर्व पर्यायांचा शोध घेण्यास सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विनेशला मदत होणार असेल तर तिच्या अपात्रतेबद्दल तीव्र निषेध नोंदवावा, अपील दाखल करावे अशीही सूचना पीएम मोदी यांनी पीटी उषा यांना केली आहे. 


विनेश फोगाटच्या अपात्रेनंतर चक्रावून टाकणार 10 मुद्दे-


१) विनेश फोगट ही मूळची 53 किलो वजनी गटाची पैलवान होती.
३) पण 53 किलो वजनी गटातून पैलवान अंतिम पंघाल खेळत असल्यानं विनेशसमोर 50 किलो वजनी गटातून खेळण्याचा पर्याय होता.
३) किर्गिस्तानमधल्या आशियाई पात्रता कुस्तीत खेळून ती पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 किलो गटात खेळण्यासाठी पात्र ठरली.
४) पण मूळ 53 किलो वजनी गटातल्या पैलवानाला सतत 50 किलोच्या आत राहाणं सोपं नसतं.
५) त्यात पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्ती स्पर्धेचं आयोजन एकऐवजी दोन दिवसांवर झालं. त्यामुळं पैलवानांची वजनं एकऐवजी दोन दिवसं होणार हे निश्चित झालं होतं.
६) या परिस्थितीत विनेशचं वजन दोन दिवस नियंत्रणात राहण्यासाठी अधिक दक्ष राहाणं अपेक्षित होतं.
७) विनेशचं कुस्तीच्या पहिल्या दिवशी म्हणजे काल सकाळी भरलेलं वजन 50 किलोच्या आत होतं. त्यामुळं काल ती खेळू शकली.
८) पण काल तीन कुस्त्या जिंकताना, त्यादरम्यान आणि त्यानंतर काय खाल्लं, ती किती पाणी प्यायली यावर लक्ष ठेवण्याची आवश्कता होती. ते झालं का?
९) दिवसभरात तीन कुस्त्या खेळून थकलेल्या विनेश फोगटला तिचं वजन घटवण्यासाठी आणखी किती मेहनत घ्यावी लागली?
१०) विनेशचं 100 ग्रॅम जादा वजन घटवण्यासाठी आणखी काय करता आलं असतं?, कारण तिच्या सासरे राजपाल राठी यांनी केस बारीक करता आले असते असा पर्याय बोलून दाखवला आहे.


संबंधित बातमी:


Vinesh Phogat: विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून अपात्र; भारताला मोठा धक्का, एका रात्रीत काय घडलं?