PV Sindhu wins Bronze Medal: भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. पीव्ही सिंधूने चीनची खेळाडू बिंग जिओचा 21-13, 21-15 असा पराभव करत कांस्यपदक जिंकले. तिचे पालक या विजयाने आनंदित झाले आहेत. त्यांनी सांगितले की त्यांना त्यांच्या मुलीच्या यशाचा अभिमान आहे.
सामन्यावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले होते : पीव्ही सिंधूचे वडील
पीव्ही सिंधूचे वडील पी व्ही रमना म्हणाले, "मी सर्वांचे आभार मानतो. मी मीडियाचा आभारी आहे. काल मी तिला खूप प्रोत्साहित केले. मला आनंद आहे की ती ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू बनली आहे. कालच्या दिवशी तिच्या डोळ्यात अश्रू आले होते. पण मी म्हणालो आजच्या सामन्यावर लक्ष केंद्रित कर.
'तीन ऑगस्टला दिल्लीला येत आहे'
ते म्हणाले की, "मी तिला प्रोत्साहित करण्यासाठी तिच्याशी बोललो. ती कोर्टात आक्रमक होती. मी तिला तेच फटके पुन्हा रिपीट करायला सांगितले होते. ती 3 ऑगस्टला दिल्लीला येत आहे. आम्ही तिला खूश करण्याची इच्छा आहे. मला खात्री आहे की ती पुढील ऑलिम्पिक देखील खेळेल.”
पदक तर पदक असते : पीव्ही सिंधूची आई
त्याचवेळी पीव्ही सिंधूची आई म्हणाली, "आज तिने पदक जिंकले आहे, मला खूप आनंद झाला आहे. आम्ही सुवर्ण गमावले पण हे देखील त्याच बरोबरीचे आहे. पदक तर पदक असते. सिंधूला खूप खूप शुभेच्छा, आम्हाला तिचा अभिमान आहे."
पीव्ही सिंधूने रचला इतिहास
या विजयासह पीव्ही सिंधू ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. अनुभवी कुस्तीपटू सुशील कुमार बीजिंग 2008 गेम्समध्ये कांस्यपदक आणि लंडन 2012 गेम्समध्ये रौप्य पदक जिंकून ऑलिम्पिकमध्ये दोन वैयक्तिक पदके जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू बनला होता. जागतिक क्रमवारीत 7 व्या स्थानावर असलेल्या सिंधूने मुसाहिनो फॉरेस्ट स्पोर्ट्स प्लाझा येथे 53 मिनिटे चाललेल्या कांस्य पदकाच्या सामन्यात जागतिक क्रमवारीत 9 व्या स्थानावर असलेल्या डावखुऱ्या बिंग जिओचा 21-13, 21-15 असा पराभव केला. सिंधूला उपांत्य फेरीत चायनीज तैपेईच्या ताई जू यिंगकडून 18-21, 12-21 असे पराभूत व्हावे लागले होते.