Tokyo Olympics 2020 : आज टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिला हॉकी संघ सेमीफायनल्सचा सामना अर्जेंटीनासोबत खेळणार आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाला सेमीफायनल्सच्या सामन्यात बेल्जियमकडून पराभव पत्करावा लागला होता. तेव्हापासून सर्वांच्या नजरा महिला हॉकी संघाकडे लागून राहिल्या आहे. देशातील प्रत्येक जण आज यांच्या विजयासाठी प्रार्थना करत आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघानं इतिहास रचला आहे. दिग्गज ऑस्ट्रेलियाला नमवून भारतीय संघानं पहिल्यांदाच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. अशातच भारतीय महिला हॉकी संघ सुवर्णपदकापासून केवळ दोन पावलं दूर आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार आज दुपारी 3.30 वाजता सुरु होणार आहे.
ऑलिम्पिक सुवर्णपदकापासून संघ केवळ दोन पावलं दूर
भारतीय महिला हॉकी संघ ऑलिम्पिक सुवर्णपदकापासून केवळ दोन पावलं दूर आहे. दरम्यान, यापूर्वी त्यांना फायनल्स गाठण्यासाठी सेमीफायनल्समध्ये अर्जेंटीनावर मात करावी लागेल. सध्या भारतीय महिला संघानं इथपर्यंत पोहोचण्यासाठी तीन वेळचा चॅम्पियन संघ ऑस्ट्रेलियाला 1-0 अशा फरकानं पराभूत करत माघारी धाडलं आहे.
भारतीय संघाला आक्रमक खेळी करावी लागेल
चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर भारतीय संघ पूर्ण आत्मविश्वासानं आज सेमीफायनल्ससाठी मैदानावर उतरणार आहे. तसेच भारतीय हॉकी संघाचा माजी सदस्य आणि ऑलंपियन जगबीर सिंहचं म्हणणं आहे की, अर्जेंटीनाचे खेळाडू अनेकदा आक्रमक होत हॉकी खेळताना दिसून येतात. अशातच आपल्या खेळाडूंनाही आक्रमक खेळी करावी लागले. त्यांचं म्हणणं आहे की, सामन्या दरम्यान भारतीय संघाला अधिकाधिक पेनल्टी कॉर्नर मिळवावे लागतील. तसेच या पेनल्टी कॉर्नरवर गोलही डागावे लागतील.
चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला धाडलं माघारी
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघानं इतिहास रचला आहे. दिग्गज ऑस्ट्रेलियाला नमवून भारतीय संघानं पहिल्यांदाच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाचा 1-0 असा पराभव करत पहिल्यांदाच सेमीफायनल गाठली आहे. ग्रुप स्टेजमधून सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचा विक्रम पहिल्यांदाच भारतीय महिला संघानं केला आहे. टीम इंडियानं या सामन्यात गुरजीत कौरच्या एकमेव गोलच्या बळावर हा ऐतिहासिक विजय मिळवला. दुसऱ्या क्वार्टरमध्ये 22 व्या मिनिटाला गुरजीतनं एक गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. ही आघाडी शेवटपर्यंत टिकवण्यात टीम इंडिया यशस्वी ठरली. या सामन्यात भारताची गोलकिपर सवितानं जबरदस्त खेळाचं प्रदर्शन केलं. सवितानं ऑस्ट्रेलियाचं मजबूत आक्रमण अनेकदा परतवून लावलं. विशेष म्हणजे पेनाल्टी क़ॉर्नरवर तिने केलेला बचाव हा वाखाणण्याजोगाच होता. तिच्या या कामगिरीमुळं सोशल मीडियावर तिचं चांगलंच कौतुक होत आहे.
देशभरात भारतीय महिला संघाच्या विजयासाठी प्रार्थना
सध्या देशात भारतीय महिला संघाच्या विजयासाठी प्रार्थना केल्या जात आहे. कर्णधार राणी रामपाल आणि नवजोत कौरचे वडिल सतनाम सिंह यांचं म्हणणं आहे की, ते मंदिर आणि गुरुद्वाऱ्यात जाऊन संघाच्या विजयासाठी प्रार्थना करणार आहेत. अशातच भारतीय महिला संघाच्या सलगच्या विजयामुळं त्यांच्या रॅकिंगमध्येही सुधारणा झाली आहे. जागतिक रॅकिंगमध्ये आतापर्यंत आपल्या सर्वश्रेष्ठ कामगिरीमुळे भारतीय महिला संघ सातव्या स्थानावर पोहोचला आहे.