नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची पैलवान विनेश फोगाट (Vinesh Phogat) हिनं क्यूबाची पैलवान वाय. गुझमन लोपेझ हिला 5-0 असं पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र, अंतिम फेरीपूर्वी करण्यात आलेल्या चाचणीत विनेश फोगाट हिचं वजन 50 किलो 100 ग्रॅम आढलल्यानं तिला स्पर्धेतून निलंबित करण्यात आलं. या घटनेमुळं भारतीयांना मोठा धक्का बसला आहे. विनेश फोगाट हिची सहकारी साक्षी मलिक हिनं भावना व्यक्त केल्या आहेत. साक्षी मलिक हिनं विनेश फोगाट हिच्या सोबत जे घडलं त्यातून ती कोणत्या परिस्थितीतून जात आहे याचा विचार करु शकत नाही, असं म्हटलं.   


साक्षी मलिक नेमकं काय म्हटलं?  


माझं मन घाबरुन गेलं आहे, मी अस्वस्थ असून विनेश फोगाटनं जे करुन दाखवलं होतं ते कल्पनेपलीकडील होतं. ही ऑलिम्पिकमध्ये एखाद्या भारतीय खेळाडूसाठी सर्वात विनाशकारी घटना आहे.  आपण विचार करु शकत नाही विनेश फोगाट कोणत्या स्थितीतून जात असेल, असं साक्षी मलिक म्हणाली. जर शक्य असतं तर मी आपलं पदक विनेशला दिलं असतं, असं साक्षी मलिक म्हणाली. साक्षी मलिकनं आणखी एक ट्विट करत दु:खाची रात्र मोठी असेल पण रात्रच आहे, अशा शब्दात विनेश फोगाटचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला.  


 विनेश फोगाट रुगणालयात 


विनेश फोगाटनं अंतिम फेरीत धडक दिल्यानंतर भारतीयांना एक पदक निश्चित झाल्यानं आनंद झाला होता. मात्र, 7 ऑगस्टला विनेश फोगाटसह कोट्यवधी भारतीयांचं स्वप्न भंगलं. विनेश फोगाटचं वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम अधिक भरल्यानं तिला स्पर्धेतून बाद करण्यात आलं. विनेशनं वजन कमी करण्यासाठी देखील खूप मेहनत घेतली होती. विनेश फोगाट, तिचे प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ यांनी सर्व गोष्टी केल्या होत्या. विनेश फोगाटनं केस कापले होते, विनेश फोगाटनं रक्त देखील काढलं होतं. वजन कमी करण्यासाठी तिनं ही पावलं उचलली होती. विनेश फोगाटला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डीहायड्रेशनमुळं विनेश फोगाटला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं भारतीय कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष संजय सिंह यांनी सांगितलं.


विनेश फोगाटच्या निलंबनानं देशवासियांना मोठा धक्का


विनेश फोगाटनं अंतिम फेरीत धडक दिल्यानं भारतीयांना मोठा आनंद झाला होता. भारतानं ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत तीन कांस्य पदकं जिंकली होती. विनेश फोगाटनं भारताला रौप्य किंवा सुवर्णपदक मिळवून दिलं असतं.मात्र, विनेश फोगाटला 50 किलोपेक्षा अधिक वजन ठरल्यानं स्पर्धेतून निलंबित करण्यात आलं. विनेश फोगाटच्या निलंबनाची बातमी कळताच देशवासियांना मोठा धक्का बसला आहे. 


संबंधित बातम्या :


Vinesh Phogat : एक ग्रँम वजन सुद्धा सुवर्णसंधी गमावू शकते, 100 ग्रँम वजन कमी झालं नसतं का? आता पुढे काय?? 10 प्रश्नांमधून समजून घ्या प्रक्रिया आहे तरी काय?


Vinesh Phogat :पॅरिसमध्ये विनेश फोगाटसोबत काय घडलं? मनसूख मांडवीय यांनी लोकसभेत घटनाक्रम सांगितला