नवी दिल्ली : भारतीय पुरुष हॉकी संघाने आज टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. हॉकी संघाने जर्मनीला 5-4 ने हरवून कांस्यपदक पटकावले. ऑलिम्पिकमध्ये, पुरुष हॉकी संघाने 41 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले आहे. संपूर्ण देश हॉकी संघाचा हा जबरदस्त विजय साजरा करत आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून हॉकी संघाचे अभिनंदन केले आहे. हॉकी कर्णधार मनप्रीत सिंग आणि प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांचा पंतप्रधान मोदींशी बोलतानाचा व्हिडिओही समोर आला आहे.


हॉकी संघाने आज जे काही केले, त्यामुळे संपूर्ण देश आनंदी आहे : पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी कॅप्टन मनप्रीत सिंग यांना फोनवर म्हणता, की "मनप्रीत खूप अभिनंदन. तुम्ही आणि संपूर्ण टीमने जे केले, त्यानंतर संपूर्ण देश नाचत आहे. संपूर्ण टीमने खूप मेहनत घेतली आहे. माझ्याकडून संपूर्ण टीमचे अभिनंदन करा." मोदी पुढे म्हणाले, की "आज संपूर्ण देशाला तुम्हा सर्वांचा अभिमान आहे."


पंतप्रधान मोदींनी ट्विट करूनही दिल्या शुभेच्छा 
तत्पूर्वी, पीएम मोदींनी ट्विट करूनही संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. पंतप्रधान मोदींनी लिहिले, "ऐतिहासिक! असा दिवस जो प्रत्येक भारतीयाच्या स्मरणात कोरला जाईल. कांस्य पदक जिंकल्याबद्दल आमच्या पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन. भारताला आपल्या हॉकी संघाचा अभिमान आहे."






1980 मध्ये शेवटचं पदक जिंकलं होतं
भारताने 1980 च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये शेवटचे सुवर्णपदक जिंकले होते. कांस्यपदकाबद्दल बोलायचे झाले तर भारताने 1972 च्या म्युनिक ऑलिम्पिकमध्ये नेदरलँड्सचा पराभव करून हे पदक जिंकले. टोकियोमध्ये भारताचे हे चौथे पदक आहे. हॉकी व्यतिरिक्त भारताने वेटलिफ्टिंग, बॅडमिंटन आणि बॉक्सिंगमध्ये पदके जिंकली आहेत, तर या पराभवामुळे जर्मनीने 2016 च्या रिओ ऑलिम्पिकनंतर सलग दुसरे कांस्य जिंकण्याची संधी गमावली.