नवी दिल्ली : येत्या स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण भारतीय ऑलिम्पिक तुकडीला विशेष अतिथी म्हणून लाल किल्ल्यावर आमंत्रित करणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी वैयक्तिकरित्या सर्वांना भेटणार असून त्यांच्याशी संवाद साधणार असल्याची माहिती मिळाली आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये 120 पेक्षा जास्त खेळाडूंसह 228 लोकांची तुकडी भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. पंतप्रधान मोदी नियमितपणे संघाला प्रोत्साहन देतात आणि अनेक खेळाडूंशी संवाद साधतात.
आज गुजरातमध्ये आभासी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, की “या वेळी सर्वाधिक भारतीय खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. आणि हे अशा वेळी घडलंय जेव्हा शतकातील सर्वात मोठ्या साथीचा सामना केला जात आहे. हे खेळाडू पात्रच नाही तर खूप कठीण लढतही दिली आहे.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, भारतीय खेळाडूंचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढलेला आहे. हा विश्वास तेव्हाच येतो जेव्हा योग्य क्षमता ओळखली जाते आणि त्याला प्रोत्साहन दिले जाते. हा नवा विश्वास नवीन भारताचे वैशिष्ट्य बनला आहे.