Wimbledon 2021 Winner: विम्बल्डन 2021 च्या अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात सर्बियाच्या नोवाक जोकोविचने इटलीच्या मॅटिओ बेरेटीनीचा पराभव करून इतिहास रचला. नोवाक जोकोविचने आपल्या कारकीर्दीतील 20 वे ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकले आहे. जोकोविचने तीन तास 23 मिनिटे चाललेल्या अंतिम सामन्यात इटलीच्या बेरेटीनीचा 6-7 (4), 6-4, 6-4, 6-3 असा पराभव केला. विम्बल्डनमधील हे त्याचे सलग तिसरे विजेतेपद आहे.


तब्बल साडेतीन तास रंगलेल्या पुरुष एकेरीच्या या सामन्यात माटिओ बेरेटिनीने पहिल्या सेटमध्ये जोकोविचला चांगलीच लढत दिली. वेगवान सर्व्हिसेसमुळे बेरेटीनीने पहिला सेट आपल्या नावावर केला. त्यानंतर पुढच्या तीन सेटमध्ये जोकोविचने आपला अनुभव पणाला लावत बेरेटीनीवर आघाडी मिळवली. शेवटच्या सेटमध्येही बेरेटिनीने आपल्या वेगवान सर्व्हिसेस सुरुच ठेवली. मात्र, तरीही जोकोविचने अनुभवाच्या जोरावर ही लढत आपल्या नावावर केली.


जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेला बेरेटिनी विम्बल्डनची अंतिम फेरी गाठणारा  इटलीचा पहिला टेनिसपटू आहे. त्याने जेतेपदाला गवसणी घातली असती, तर एड्रियाने पानाट्टा यांच्यानंतर ग्रँडस्लॅम (1976, फ्रेंच) जिंकणारा तो इटलीचा दुसरा टेनिसपटू ठरला असता. मात्र, जोकोविचने त्याला नमवत स्वतःचं स्वप्न पूर्ण केलंय.






जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाच्या नोवाक जोकोविचने रविवारी मॅटिओ बेरेटीनीचा पराभव करून विम्बल्डन टेनिस स्पर्धेत सहाव्यांदा चॅम्पियन बनला. यासह त्याने 20 ग्रँड स्लॅम जेतेपदाच्या विक्रमाचीही बरोबरी केली आहे. या विजयासह जोकोविचने रॉजर फेडरर आणि राफेल नदालच्या 20 ग्रँड स्लॅम जेतेपदाच्या विक्रमाची बरोबरी केली. 


जोकोविचकडे सुवर्णसंधी
ऑल इंग्लंड क्लबमध्ये सातव्या फायनलमध्ये पोहोचलेला जोकोविच 30 ग्रँड स्लॅम फायनलमध्ये पोहोचलेला रॉजर फेडररनंतरचा दुसरा पुरुष खेळाडू आहे. फेडररने 31 वेळा ग्रँड स्लॅमच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. एवढेच नव्हे तर नोवाक जोकोविचकडे नदाल आणि फेडररला मागे टाकण्याची देखील संधी आहे. नोवाक जोकोविच 34 वर्षांचा आहे आणि तो बर्‍यापैकी फिट आहे. त्याचवेळी, फेडरर 40 वर्षांचा झाला आहे आणि विम्बल्डन 2021 च्या उपांत्यपूर्व फेरीत तो लयीमध्ये दिसत नव्हता. नदाला तर फ्रेंच ओपनचा बादशाह म्हटले जाते. पण यावेळी नदालदेखील फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्यात स्थान मिळविण्यात अपयशी ठरला. नोवोक आता रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्यासोबत सर्वाधिक एकेरी ग्रँड स्लॅम जेतेपद मिळविणारा खेळाडू झाला आहे. लवरच तो यांच्याही पुढे जाईल अशी आशा त्याच्या नोवोकच्या चाहत्यांना आहे.