Tokyo Olympics 2020 : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाला सेमीफायनल्समध्ये पराभवाचा सामना करावा लागला. सामन्यात भारतानं दोन गोल डागले, तर बेल्जियमनं पाच गोल डागत भारतावर मात केली. या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाचं फायनल्स गाठण्याचं स्वप्न भंगलं असून बेल्जियमनं फायनल्समध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. भारतीय पुरुष हॉकी संघ सुवर्णपदक आणि रौप्य पदकाच्या शर्यतीतून बाहेर गेला असला तरी अद्यापही कांस्यपदक जिंकण्याची संधी आहे. दुसऱ्या सेमीफायनलच्या सामन्यात विजयी संघ फायनल्समध्ये खेळणार, तर पराभूत झालेला संघाचा सामना कांस्य पदकासाठी भारतासोबत होणार आहे. 


सामन्याच्या पहिल्या क्वार्टरमध्ये अगदी सुरुवातीलाच बेल्जियमनं एक गोल डागत आघाडी घेतली होती. पण भारतानं हे आव्हान संपुष्टात आणत बेल्जियमच्या एका गोलच्या बदल्यात दोन गोल करत आघाडी कायम ठेवली होती. पण त्यानंतर मात्र वर्ल्ड चॅम्पियन असलेला बेल्जियमच्या संघानं एकही संधी दिली नाही. संपूर्ण सामन्यात बेल्जियमला 14 पेनल्टी कॉर्नर मिळाले. यापैकी तीन पेनल्टी कॉर्नवर गोल डागण्यात ते यशस्वी झाले. 


सेमीफायनल्स सामन्याचा दुसरा क्वार्टरही अत्यंत रोमांचक होता. यामध्ये दोन्ही संघांना पेनल्टी कॉर्नर मिळाले. सामन्याच्या तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताला पाचवा पेनल्टी कॉर्नर मिळाला. दरम्यान, संघाला या पेनल्टी कॉर्नवर गोल डागता आला नाही. सामन्याच्या चौथ्य क्वार्टरमध्ये पेनल्टी स्ट्रोक मिळाला आणि हेड्रिंक्सनं आणखी एक गोल डागला. या गोलसह बेल्जियमन भारतावर 5-2 अशा फरकानं विजय मिळवला. 


भारतीय महिला हॉकी संघानं रचला इतिहास, उपांत्य फेरीत प्रवेश 


टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघानं इतिहास रचला आहे. दिग्गज ऑस्ट्रेलियाला नमवून भारतीय संघानं पहिल्यांदाच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाचा 1-0 असा पराभव करत पहिल्यांदाच सेमीफायनल गाठली आहे. ग्रुप स्टेजमधून सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचा विक्रम पहिल्यांदाच भारतीय महिला संघानं केला आहे. टीम इंडियानं या सामन्यात गुरजीत कौरच्या एकमेव गोलच्या बळावर हा ऐतिहासिक विजय मिळवला. दुसऱ्या क्वार्टरमध्ये 22 व्या मिनिटाला गुरजीतनं एक गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. ही आघाडी शेवटपर्यंत टिकवण्यात टीम इंडिया यशस्वी ठरली. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Tokyo Olympics : भारतीय हॉकी टीम अन् सोनम मलिकवर साऱ्यांच्या नजरा, काय आहे 3 ऑगस्टचं भारताचं शेड्यूल?