ऑलिम्पिकमध्ये 41 वर्षानंतर भारतीय पुरुष हॉकी संघाने अखेर पदक पटकावले आहे. भारताने आज झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत जर्मनीचा 5-4 असा पराभव करून हा इतिहास रचला. गेल्या चार दशकांपासून भारतीय हॉकीला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळत नसल्याची खंत होती. ही खंत आज संपली आहे. भारतीय हॉकी संघाच्या या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण आहे. भारताच्या या विजयात सिंहाचा वाटा असलेल्या आणि जगातील सर्वोत्तम गोलरक्षकांपैकी एक असलेल्या पीआर श्रीजेशचे ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवण्याचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे.


आपल्या शेवटच्या ऑलिम्पिकमध्ये उतरलेल्या पीआर श्रीजेशच्या या ऐतिहासिक विजयाचा अर्थ तुम्ही या फोटोत पाहून शकता ज्यात तो गोलपोस्टवर बसलेला दिसत आहे. भारताच्या या स्टार गोलरक्षकाचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.


Video: पुरुष हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कर्णधार मनप्रीतला फोन


या फोटोबाबत श्रीजेश म्हणाला की मी माझे संपूर्ण आयुष्य गोलपोस्टवर घालवले आहे, गोलपोस्ट हे माझ्यासाठी सर्वकाही आहे. या फोटोद्वारे मला सांगायचे होते की मी या गोलपोस्टचा मालक आहे.


श्रीजेश क्वचितच विजयाचा आनंद साजरा करताना दिसतो. परंतु, त्याने भारतासाठी त्याच्या कारकिर्दीतील या ऐतिहासिक आणि सर्वात मोठ्या विजयावर खूप आनंद साजरा केला. अतिशय शांत स्वभावाचा गोलरक्षक श्रीजेश नेहमी दबावाच्या वेळी चांगली कामगिरी करतो, तो दाखवून देतो की तो किती मोठा खेळाडू आहे.


श्रीजेशने 21 वर्षांचा अनुभव लावला अन्..


श्रीजेश त्याच्या विजयाबद्दल म्हणाला की मी गेली 21 वर्षे हॉकी खेळतो आहे. आज मी माझा 21 वर्षांचा अनुभव या 60 मिनिटांसाठी लावला. शेवटच्या पेनल्टीवर तो म्हणाला, की मी फक्त स्वतःला सांगितले की तू 21 वर्षांपासून हा गेम खेळत आहेस, आता तुला हे करायचे आहे आणि पेनल्टी वाचवायची आहे. श्रीजेशने ऑलिम्पिकमध्ये अनेक प्रसंगी संघासाठी अनेक गोल वाचवले आणि संघासाठी संकटमोचकाची भूमिका निभावली आहे. याशिवाय, उपांत्य फेरीत बेल्जियमविरुद्धच्या पराभवानंतर संपूर्ण संघाला प्रोत्साहित करण्याचे कामही श्रीजेशने केले.