मुंबई : वर्ल्डकपमध्ये सर्वोत्तम कामगिरी केलेल्या टीम इंडियाची (india vs new zealand) उद्या (15 नोव्हेंबर) न्यूझीलंडशी सेमीफायनलची लढत होत आहे. वर्ल्डकपमधील (World cup) पहिला सेमीफायनलचा सामना मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. सेमीफायनल महामुकाबल्याच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने पत्रकार परिषदेत रणनीती कशी असेल? याबाबत भाष्य केले.
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माला जेव्हा त्याच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षणाविषयी विचारण्यात आले त्यावेळी त्याने हसत हसत उत्तर दिले. आतापर्यंतचा तो खास क्षण असेल जेव्हा आमच्या टीममधील चारजणांनी शेवटच्या साखळी सामन्यामध्ये गोलंदाजी केली. मला विश्वास आहे की, या क्षणाचा आनंद सर्वांनीच घेतला असेल. नेदरलँडविरुद्ध शेवटच्या साखळी सामन्यात कॅप्टन रोहितसह विराट कोहली, शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादवने गोलंदाजी केली होती.
इतकंच नव्हे, तर रोहित शर्मा आणि कोहलीने प्रत्येकी एक विकेट घेतली होती. या पार्श्वभूमीवर रोहितने प्रतिक्रिया दिली. तो पुढे म्हणाला की 1983 मध्ये जेव्हा वर्ल्डकप जिंकण्यात आला होता त्यावेळी आम्ही आमचा जन्म सुद्धा झालेला नव्हता. जेव्हा 2011 मध्ये आमचा संघ जिंकला होता तेव्हा यामधील निम्मे खेळाडू सुद्धा खेळत नव्हते. त्यामुळे मागील वर्ल्डकप आम्ही कसा जिंकला होता? या संदर्भात आम्ही चर्चा करताना पाहिलेलं नाही. आम्ही आणखी चांगली कामगिरी कशी करू शकतो, आम्ही आणखी आमच्या कामगिरीमध्ये सुधारणा कशी करू शकतो? हाच सुंदर क्षण आहे. याच गोष्टीवर आमचा आजही लक्ष केंद्रित आहे.
मुंबईच्या मैदानात सेमीफायनलसाठी टाॅस किती महत्वाचा?
उद्याच्या सामन्यात टाॅस किती महत्वाचा असेल? याबाबतही रोहितला विचारणा करण्यात आली. यावेळी रोहितने अगदी विश्वासाने दोन वाक्यामध्ये विषय संपवला. तो म्हणाला की, मी याठिकाणी खूप क्रिकेट खेळलो आहे. त्यामुळे टाॅस आमच्यासाठी फार महत्वाचा नाही. रोहित शर्मा पुढे म्हणाला की, माझ्याजवळ कुठलाही मंत्र नाही. एक कप्तान म्हणून जर तुम्ही काही गोष्टी निश्चित केल्या असतील तर तुम्हाला त्या पद्धतीने खेळ करावा लागेल. तुमच्याजवळ तुमच्या विचारांची स्पष्टता असावी लागेल. त्याचबरोबर आपल्या खेळाडूंना जबरदस्त पाठिंबा द्यावा लागेल. ज्या खेळाडूंना पाठिंबा दिला आहे, ज्यांना जबाबदारी दिली आहे त्यांच्यासोबत आम्हाला उभं राहावं लागेल.
टीम इंडियाचा जबरदस्त फॉर्म
दरम्यान, सध्या टीम इंडिया वेगळ्याच फॉर्ममध्ये आहे. टीम इंडियाने साखळी टप्प्यातील 8 सामने जवळपास एकतर्फी जिंकले. या विश्वचषकात भारताने सर्व 9 संघांना पराभूत केले असून याआधी आशिया कपमध्ये टीम इंडियाने एकतर्फी विजय मिळवला होता. या विश्वचषकात भारताने श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढ्य संघांना 100 धावाही करण्याची संधी दिली नाही. दुसरीकडे, या विश्वचषकाच्या सुरुवातीला न्यूझीलंडनेही उत्कृष्ट क्रिकेट खेळले, मात्र त्यानंतर त्यांना सलग 4 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे सध्या भारताचा फॉर्म न्यूझीलंडपेक्षा चांगला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या