धर्मशालाः न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत मिळवलेल्या निर्भेळ यशाने टीम इंडियाचा आत्मविश्वास उंचावला आहे. त्यामुळे आता पाच वन डे सामन्यांच्या आगामी मालिकेवरही निर्विवाद वर्चस्व गाजवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असणार आहे.


भारत आणि न्यूझीलंडमधल्या या मालिकेतला सलामीचा सामना धर्मशालात खेळवण्यात येईल. विराट कोहलीच्या टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 3-0 असा विजय मिळवून आयसीसीच्या क्रमवारीत भारताला अव्वल स्थान मिळवून दिलं आहे.

आता महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखालीही आयसीसीच्या वन डे सामन्यांच्या क्रमवारीत एक पाऊल पुढे टाकण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. टीम इंडियाने पाच वन डे सामन्यांची ही मालिका 4-1 अशी जिंकली, तर आयसीसीच्या क्रमवारीत भारताला चौथ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर दाखल होता येईल.

आयसीसीच्या वन डे क्रमवारीत न्यूझीलंड सध्या 113 गुणांसह तिसऱ्या स्थानावर असून, चौथ्या स्थानावरच्या भारताच्या खात्यात 110 गुण आहेत.