न्यूयॉर्क : सर्बियन टेनिसस्टार नोवाक जोकोविचने अमेरिकन ओपनमधील पुरुष एकेरीच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोत्रोचा पराभव करुन जोकोविचने तिसऱ्यांदा यूएस ओपनची ट्रॉफी उंचावली. 14 वं ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवत नोवाकने अमेरिकेचे दिग्गज टेनिसपटू पीट सॅम्प्रस यांच्या विक्रमाची जोकोविचने बरोबरी केली.


जोकोविचने 6-3, 7-6 (7-4), 4-3 अशा सरळ सेट्समध्ये पोत्रोला धूळ चारली. पहिल्या सेटमध्ये जोकोविचने पोत्रोवर निर्विवाद वर्चस्व मिळवलं होतं. मात्र दुसऱ्या सेटमध्ये पोत्रोने कडवी झुंज देत जोकोचं घामटं काढलं. दुसरा सेट शेवटच्या क्षणापर्यंत रोमांचक होत गेला, अखेर टायब्रेकरमध्ये जोकोविचने सेट खिशात घातला.

तिसऱ्या सेटची सुरुवात जोकोविचने चांगली केली असली, तरी पोत्रोने 3-3 ने बरोबरी करत जोकोविचला पुन्हा झुंजवलं. अखेर चौथा आणि पाचवा गेम जिंकत जोकोविचने पोत्रोला आपणच बादशाह असल्याचं दाखवून दिलं.

14 वं ग्रँड स्लॅम विजेतेपद

जोकोविचचं हे तिसरं अमेरिकन ओपन, तर 14 वं ग्रँड स्लॅम विजेतेपद ठरलं. जोकोविचने 2011 आणि 2015 साली अमेरिकन ओपनचं विजेतेपद पटकावलं होतं. त्याशिवाय, त्याच्या नावावर सहा ऑस्ट्रेलियन ओपन, चार विम्बल्डन आणि एक फ्रेंच ओपन जमा आहेत.

यंदाच्या हंगामातील सलग दुसरं ग्रँडस्लॅम विजेतेपद काबीज करत जोकोविचने शेवट गोड केला. यंदाचं विम्बल्डन विजेतेपदही जोकोविचने पटकावलं होतं.

पीट सॅम्प्रस यांच्या विक्रमाची बरोबरी

अमेरिकेचे दिग्गज टेनिसपटू पीट सॅम्प्रस यांच्या विक्रमाची जोकोविचने बरोबरी केली. सॅम्प्रस यांनी 14 ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवण्याचा विक्रम रचला होता. रॉजर फेडरर (20 ग्रँडस्लॅम जेतेपद) राफेल नादाल (17) हे दोघं या यादीत अव्वल आहेत.

अमेरिकन ओपनच्या उपांत्य फेरीत जोकोविचने जपानच्या केई निशीकोरीला हरवून अंतिम फेरीत स्थान मिळवलं होतं. राफेल नदालने गुडघ्याच्या दुखापतीमुळे पोत्रोविरुद्धच्या उपांत्य सामन्यातून माघार घेतली होती. त्यामुळेच पोत्रोला अंतिम फेरी गाठता आली होती.

19 पैकी 15 वेळा जोकोविच'च'

गेल्या दहा वर्षांत जोकोविच आणि पोत्रो पहिल्यांदाच ग्रँड स्लॅम फायनलमध्ये आमनेसामने आले होते. ते आतापर्यंत 19 वेळा एकमेकांना भिडले असून त्यापैकी 15 वेळा जोकोविच सरस ठरला. 2009 साली पोत्रोने अमेरिकन ओपनचं विजेतेपद पटकावलं होतं, मात्र यंदा अंतिम फेरीत प्रवेश मिळवूनही विजेतेपदाने त्याला हुलकावणी दिली.

यूएस ओपनच्या महिला एकेरीत जपानच्या नाओमी ओसाकाने विजेतेपद मिळवलं. टेनिस सम्राज्ञी सेरेना विल्यम्सचा पराभव करुन नाओमीने जेतेपद पटकावलं.