पॅरिस : सर्बियाचा वर्ल्ड नंबर वन नोवाक जोकोविचचं फ्रेन्च ओपन जिंकण्याचं स्वप्न अखेर साकार झालं. जोकोविचनं पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत अँडी मरेला 3-6, 6-1, 6-2, 6-4 असं हरवून पहिल्यांदाच फ्रेन्च ओपनचं विजेतेपद साजरं केलं.
या विजयाबरोबरच जोकोविचनं आपलं करियर ग्रँड स्लॅम पूर्ण केलं. करियर ग्रँड स्लॅम अर्थात ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेन्च ओपन, विम्बल्डन आणि अमेरिकन ओपन या चार मानाच्या स्पर्धांमध्ये किमान एकदा विजेतेपद मिळवणारा जोकोविच आजवरचा आठवा आणि ओपन इरामधला चौथाच टेनिसपटू ठरला आहे.
इतकंच नाही, तर जोकोविचनं सलग चार ग्रँडस्लॅम विजेतेपदं मिळवण्याचा पराक्रमही गाजवला आहे. अशी कामगिरी बजावणारा जोकोविच ओपन इरामधला पहिलाच पुरुष टेनिसपटू ठरला आहे.
ओपन इरामध्ये केवळ मार्टिना नावरातिलोव्हा आणि स्टेफी ग्राफनं एकेकदा तर सेरेना विल्यम्सन दोनदा सलग चार विजेतेपदांवर आपलं नाव कोरलं होतं. त्यानंतर जोकोविचनं ही कामगिरी बजावली आहे.
जोकोविचच्या नावावर आता ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सहा, फ्रेन्च ओपनमध्ये एक, विम्बल्डनमध्ये तीन, आणि अमेरिकन ओपनमध्ये दोन विजेतेपदं जमा आहेत.