नवी दिल्ली : माजी हॉकीस्टार मोहम्मद शाहीद यांचं वयाच्या 56 व्या वर्षी निधन झालं. यकृत आणि किडनीच्या आजारपणातून गुरगावच्या मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


 
काविळ आणि डेंग्यूची लागण झाल्यामुळे त्यांची महिन्याभरापासून मृत्यूशी झुंज सुरु होती. वाराणसीतील रुग्णालयातून त्यांची रवानगी गुरगावच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये करण्यात आली होती.

 

 

केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी गेल्याच आठवड्यात शाहीद यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यांच्या उपचारांसाठी दहा लाख रुपयांची मदतही जाहीर करण्यात आली होती. मोहम्मद शाहीद रेल्वेच्या सेवेत कार्यरत होते.

 
1980 च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या भारतीय हॉकी संघात शाहीद होते. 1984 आणि 1988 च्या ऑलिम्पिकमधील हॉकी संघाचं नेतृत्वही त्यांनी केलं होतं.

 

 

हॉकी विश्वात शाहिद यांचं स्टीकवर्क आणि ड्रिब्लिंगसाठी मोठं नाव होतं. शाहीद यांच्या नेतृत्वात 1982 आणि 1986 च्या आशियाई खेळात रौप्य आणि कांस्यपदकी पटकावलं होतं. 1981 साली अर्जुन पुरस्कारानेही शाहीद यांचा गौरव करण्यात आला होता, तर 1986 मध्ये पद्मश्रीने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं.