मुंबई: टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची निवड होणार? याची क्रिकेट चाहत्यांनाही उत्सुकता लागून राहिली आहे. क्रिकेट सल्लागार समितीनं काल यासाठी वेळही मागून घेतला होता. त्यावेळी या समितीचा सदस्य सौरव गांगुली म्हटलं होतं की, 'आम्ही विराट कोहलीशी बातचीत करु आणि याबाबत निर्णय घेऊ.'

सीएसीने पाच उमेदवारांची मुलाखत घेतली होती. यामध्ये वीरेंद्र सेहवाग, रवी शास्त्री, टॉम मूड, रिचर्ड पायबस आणि लालचंद राजपूत यांचा समावेश होता.

'अंतिम निर्णय हा सचिन, गांगुली आणि लक्ष्मण हेच घेतील.'
याबाबत बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिली. 'मी एक गोष्ट स्पष्ट करु इच्छितो की, अंतिम निर्णय हा सचिन, गांगुली आणि लक्ष्मण हे तिघेच म्हणजेच क्रिकेट सल्लागार समितीच घेईल. याबाबत विराट कोहली कोणताही निर्णय घेणार नाही. जेव्हा गांगुली काल म्हणाला की, आम्ही विराटशी बोलू, याचा अर्थ असा होता की, सीएसीला प्रत्येक उमेदवाराबद्दल काय वाटतं आणि त्यांनी प्रशिक्षकपदासाठी कोणत्या उमेदवाराला निवडलं आहे हे त्याला सांगितलं जाईल.'

'प्रशिक्षक निवडीत विराटचा सल्ला घेतला जाणार नाही. पण ज्या उमेदवाराची निवड प्रशिक्षक पदी केली जाईल त्याच्याबाबतची माहिती विराटला दिली जाईल. त्याच्या निवडीमागे नेमका कोणता तर्क आहे याचाही विराटला माहिती दिली जाईल. या निवड प्रकियेची फक्त त्याला माहिती दिली जाईल.' असंही बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनं सांगितलं.

सुत्रांच्या मते, 'काही प्रेझेंटेशन फारच उत्कृष्ट होते. पायबस आणि मूडी यांना अनेक कठीण प्रश्नही विचारण्यात आले. त्याची त्यांनी चांगली उत्तरंही दिली. रवी शास्त्री आणि वीरेंद्र सेहवागलाही बरेच कठीण प्रश्न विचारले. त्यांनीही त्याची विस्तृतपणे उत्तरं दिली.'

प्रत्येक उमेदवाराला दोन प्रश्न प्रामुख्याने विचारण्यात आले.

1. इंग्लंडमध्ये होणाऱ्या 2019च्या विश्वचषकासाठी त्यांचं व्हिजन काय?

2. कर्णधाराच्या तुलनेत कोचची भूमिका काय?