चेन्नई : चेन्नईत दोन दिवसांआधी झालेल्या वादळाने टीम इंडियाच्या खेळाडूंना बुधवारी वायफाय आणि इंटरनेट सुविधांपासून वंचित राहावं लागलं. त्यामुळे विराट कोहली अँड कंपनीने व्हिडियो गेम खेळून मोकळा वेळ घालवला.

चेन्नईत झालेल्या वादळामुळे चिदंबरम स्टेडियमवर बुधवारी सराव करणं शक्य झालं नाही. त्यात मोकळा वेळ घालवण्यासाठी टीम इंडियाच्या खेळाडूंना वायफाय आणि इंटरनेट सुविधाही उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे विराटसह चेतेश्वर पुजारा, केएल राहुल आणि करुण नायरने मैदानावरच्या अॅक्शनची तहान फुटबॉलच्या व्हिडियो गेम्सवर भागवली.



16 डिसेंबरला अखेरची कसोटी

भारत आणि इंग्लंड संघांमधल्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटीसाठी चेन्नईचं एम. ए. चिदम्बरम स्टेडियम सज्ज झालं आहे. चेन्नईला वरदा चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. त्यामुळे या कसोटीच्या आयोजनाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. पण तामिळनाडू क्रिकेट असोसिएशननं वेळेत मैदान कसोटीसाठी सज्ज होईल अशी ग्वाही दिली.

त्यानंतर बुधवारी सकाळी मैदान ओलं असल्याने इंग्लंड संघाला त्यांचं सरावसत्र रद्द करावं लागलं. पण आता बीसीसीआयने चिदम्बरम स्टेडियमच्या मैदानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून, ही कसोटी नियोजित वेळेनुसार म्हणजे 16 डिसेंबरला सुरू होणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे.