मुंबई : न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रँडन मॅक्युलम टी20 क्रिकेटमध्ये 9 हजार धावांचा टप्पा ओलांडणारा दुसराच क्रिकेटपटू ठरला आहे. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात खेळताना मॅक्युलमने नऊ हजारांचा टप्पा गाठला.


आयपीएलच्या अकराव्या मोसमात ब्रँडन मॅक्युलम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघातून खेळत आहे. रविवारी केकेआरविरुद्धच्या सामन्यात 24 चेंडूंमध्ये 43 धावा झळकावून त्याने नऊ हजार धावांचा पल्ला गाठला.

ब्रँडन मॅक्युलमने टी20 मध्ये 9 हजार 35 धावा पूर्ण केल्या आहेत. 137.81 च्या स्ट्राईक रेटने 30.94 च्या सरासरीने त्याने 9 हजार धावा पूर्ण केल्या.

टी20 मध्ये सर्वाधिक धावा ठोकण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या नावे आहे. गेलने 11 हजार 68 धावा ठोकल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर मॅक्युलम असून तिसऱ्या क्रमांकावर विंडीजचा ऑल राऊंडर किरन पोलार्ड (8048 धावा), चौथ्या स्थानी पाकिस्तानचा शोएब मलिक (7728 धावा) तर पाचव्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर (7668 धावा) आहे.

आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये मॅक्युलमने शेवटचा सामना जून 2015 मध्ये खेळला होता. पावणेतीन वर्षांत एकही आंतरराष्ट्रीय टी20 मॅच खेळली नसतानाही तो 2 हजार 140 धावा ठोकून दुसऱ्या क्रमांकावर आहे. आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक धावसंख्येच्या यादीत न्यूझीलंडचा मार्टिन गप्टील (2271 धावा) अव्वल असून भारतीय कर्णधार विराट कोहली या यादीत (1983 धावा) तिसऱ्या स्थानी आहे.