हॅमिल्टन : हॅमिल्टनच्या तिसऱ्या आणि अखेरच्या ट्वेन्टी ट्वेन्टीत अटीतटीच्या झालेल्या लढतीत न्यूझीलंडनं टीम इंडियावर 4 धावांनी विजय साजरा केला. या विजयासह न्यूझीलंडनं तीन T20 सामन्यांची मालिका 2-1 अशी खिशात घातली. या सामन्यात न्यूझीलंडनं भारतासमोर 213 धावांचं मोठं लक्ष्य ठेवलं होतं.


या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सहा बाद 145 अशी अवस्था झाली होती. त्यानंतर दिनेश कार्तिक आणि कृणाल पंड्यानं सातव्या विकेटसाठी 63 धावांची अभेद्य भागीदारी रचली. पण तरीही टीम इंडियाची विजयाची संधी अवघ्या चार धावांनी हुकली.

भारताची सुरुवातच निराशाजनक झाली. सलामीवीर शिखर धवन अवघ्या 5 धावांवर तंबूत परतला. यानंतर रोहित शर्मा आणि विजय शंकरने डाव सावरला. फार्मात खेळणारा विजय शंकर फटकेबाजीच्या नादात 43 धावांवर बाद झाला. यानंतर आलेल्या रिषभ पंतने आक्रमक खेळी करत धावसंख्या वाढविण्याचा प्रयत्न केला. पंत 28 धावांवर बाद झाल्यानंतर रोहित शर्माही 38 धावा करून बाद झाला. यानंतर आलेल्या हार्दिक पंड्याने चांगली फलंदाजी केली मात्र तो जास्त काळ तग धरू शकला नाही. शेवटी दिनेश कार्तिक आणि कृणाल पंड्याने फटकेबाजी करत सामन्यात रोमांच आणला. मात्र भारताला परभवापासून ते वाचवू शकले नाहीत.

त्याआधी, न्यूझीलंडनं या सामन्यात वीस षटकांत चार बाद 212 धावांची मजल मारली. कॉलिन मन्रो आणि टिम सीफर्टनं दिलेली 80 धावांची सलामी आणि मधल्या फळीतल्या फलंदाजांची दमदार कामगिरी न्यूझीलंडला लाभदायक ठरली. कॉलिन मन्रोनं 40 चेंडूत पाच चौकार आणि पाच षटकारांसह 72 धावांची खेळी साकारली.

सीफर्टनं तीन चौकार आणि तीन षटकारांसह 43 धावा फटकावल्या. त्यानंतर केन विल्यमसन आणि कॉलिन डी ग्रँडहोमच्या फटकेबाजीनं न्यूझीलंडला 200 धावांचा टप्पा ओलांडून दिला.

या सामन्यात भारतानं टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला होता. रोहित शर्माच्या टीम इंडियाला वनडे आणि कसोटीनंतर हा सामना जिंकून न्यूझीलंड दौऱ्यात नवा इतिहास घडवण्याची संधी होती. पहिल्या दोन सामन्यात भारतानं संघात काहीही बदल केले नव्हते. मात्र तिसऱ्या अखेरच्या सामन्यात संघात एक बदल करण्यात आला होता. युजवेंद्र चहलच्या जागी कुलदीप यादवला संघात संधी देण्यात आली होती.

भारतीय संघानं यंदाच्या मोसमात ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच कसोटी आणि वन डे सामन्यांची मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. त्यानंतर टीम इंडियानं दहा वर्षांनी न्यूझीलंडमध्ये वन डे सामन्यांची मालिका जिंकली.

पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडने 219 धावांचा डोंगर उभारला होता. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला न्यूझीलंडने 139 धावांत रोखलं होतं. तर दुसऱ्या सामन्यात भारताने न्यूझीलंडला 158 धावांत रोखलं होतं. कर्णधार रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतानं सामना जिंकला होता. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 अशी बरोबरीत आहेत. त्यामुळे आजच सामना निर्णायक ठरणार आहे.