मुंबई : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने रविवारी वेलिंग्टनच्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा धुव्वा उडवला. हा सामना जिंकून भारताने न्यूझीलंडविरुद्धची मालिका 4-1 ने जिंकली. या सामन्यात धोनीला फलंदाजीमध्ये चमक दाखवता आली नाही. परंतु यष्टीरक्षक म्हणून धोनीने नेहमीप्रमाणे कमाल केली. धोनीच्या यष्टीमागच्या चपळतेमुळे सामना भारताच्या बाजूने झुकला. धोनीने दाखवलेल्या चपळतेमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डदेखील (आयसीसी) त्याच्यावर प्रभावित झाले आहे. आयसीसीने ट्वीट करुन धोनीचे कौतुक केले आहे.

काल झालेल्या सामन्यात भारताने दिलेले 253 धावांचे आव्हान घेऊन किवींचा संघ मैदानात दाखल झाला. सामन्याची 36 वी ओव्हर सुरु होती. ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर धोनीने मैदानावर चांगलाच जम बसलेल्या जेम्स नीशमला 'पायचितचे अपील करुन धावबाद केले'.

नीशम फलंदाजी करत असताना धोनीने अगोदर पायचितचे अपील केले. त्यामुळे नीशम गोंधळला होता. त्याचवेळी नीशमने क्रीझ सोडले. नीशमने क्रीझ सोडण्याची वाट पाहत असलेल्या धोनीने क्षणार्धात नीशमला धावबाद केले. धोनीच्या या चपळाईचे सर्व स्तरातून कालपासून कौतुक होत आहे. आयसीसीनेही यासाठी धोनीचे कौतूक केले आहे.

आयसीसीने केलं धोनीचं हटके स्टाईलने कौतुक
जपानमधील प्रसिद्ध मल्टीमीडिया कलाकार योको ओनो यांनी ट्वीट करुन प्रश्न विचारला होता की, "आम्हाला असा एक सल्ला द्या ज्यामुळे आमचे आयुष्य सुखी आणि शानदार होईल". या ट्वीटला रिट्वीट करत आयसीसीने म्हटले आहे की, "सुखी आणि शानदार आयुष्य जगायचे असेल तर, धोनी यष्टीमागे उभा असताना क्रीज सोडून कुठेही जाऊ नका." आयसीसीला हा सल्ला योको योनो यांच्यासह सर्व क्रिकेटर्सना द्यायचा असेल, असे म्हटले जात आहे.

पाहा व्हिडीओ