ना छापा, ना काटा... टॉसदरम्यान 'शोले'ची आठवण, नाणं जमिनीवर सरळ पडलं!
एबीपी माझा वेब टीम | 10 Jul 2019 07:16 AM (IST)
क्रिकेटमध्ये खेळाची सुरुवात नाणेफेकीने होते. त्यानंतरच कोणता संघ पहिल्यांदा फलंदाजी करणार आणि कोणता संघ क्षेत्ररक्षण करणार हे निश्चित होतं.
मुंबई : नाणेफेक केल्यावर नाणं सरळ जमिनीवर पडल्याचं तुम्ही कधी पाहिलं आहे? खरंतर हिंदी चित्रपटांमध्ये अशाप्रकारचे सीन तयार केले जातात. मेगाब्लॉकबस्टर 'शोले'मधला असा सीन अनेकांनी पाहिला असेल. परंतु मलेशियात झालेल्या अंडर 19 क्रिकेट सामन्यात हे प्रत्यक्षात घडलं. क्रिकेटमध्ये खेळाची सुरुवात नाणेफेकीने होते. त्यानंतरच कोणता संघ पहिल्यांदा फलंदाजी करणार आणि कोणता संघ क्षेत्ररक्षण करणार हे निश्चित होतं. परंतु मंगळवारी (9 जुलै) असा एक सामना झाला, ज्यात नाणेफेक तर झाली पण नाणं खाली पडलं तेव्हा कमालच झाली. नेपाळ आणि हाँगकाँग यांच्यात अंडर 19 एसीसी (एशियन क्रिकेट काऊंसिल) ईस्टर्न रीजन 2019 चा अंतिम सामना मंगळवारी खेळवण्यात आला. नाणेफेकीसाठी नाणं उडवून हेड किंवा टेल (छापा-काटा) विचारण्यात आलं. पण नाणं खाली आल्यावर ते कोणाच्याच बाजूने पडलं नाही. नाणं जमिनीवर सरळ पडलं. सामनाधिकाऱ्यांनी यानंतर पुन्हा नाणेफेक करण्यास सांगितलं. यावेळी नेपाळने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. या धम्माल प्रकारावर आयसीसीचीही नजर गेली. आयसीसीने एशियन क्रिकेट काऊंसिलचं ट्वीट रिट्वीट करुन, "तुम्ही यापूर्वी असं कधी पाहिलं होतं का?" असं म्हटलं आहे. हा सामना मलेशियाच्या किनरारा ओवलमध्ये खेळवण्यात आला होता. नेपाळने हाँगकाँगला पहिल्यांदा फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं. हाँगकाँगचा डाव 43.1 षटकात 95 धावांवर आटोपला. हाँगकाँग संघाने नेपाळसमोर विजयासाठी 96 धावांचं आव्हान ठेवलं. नेपाळने अवघ्या 16.1 षटकात 96 धावा करुन सामन्यासह ही स्पर्धाही जिंकली. याआधी नेपाळने मलेशियाला सात विकेट्सनी पराभूत केलं होतं. तर हाँगकाँगने डकवर्थ लुईस नियमानुसार सिंगापूरचा 51 धावांनी पराभव केला होता. नेपाळ आता 2 ऑगस्टपासून श्रीलंकेत सुरु होणाऱ्या आशिया चषकात सहभागी होणार आहे.